माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीणीला नांदणी मठात परत आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार

84

मुंबई : नांदणी मठ (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथील माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीणीला परत आणण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आढावा घेऊन, रिव्ह्यू पिटीशन दाखल करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच या प्रकरणात नागरिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

नांदणी मठाच्या परंपरा आणि स्थानिक जनतेच्या श्रद्धा व भावनांचा सन्मान राखून, सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून महादेवी हत्तीणीला पुन्हा मठात परत आणण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी देण्यात आला.

हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरांसह पथक तयार करणार

नांदणी मठाच्या परंपरा आणि स्थानिक जनतेच्या भावनांचा विचार करून कायदेशीर प्रक्रिया मार्गाने माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीणीला पुन्हा मठात परत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गेल्या 34 वर्षांपासून माधुरी हत्तीण नांदणी मठात आहे. माधुरी पुन्हा मठात यावी ही जन भावना आहे. ही जन भावना लक्षात घेऊन राज्य शासन पुनर्विचार याचिका दाखल करेल. मठानेही आपल्या याचिकेमध्ये राज्य शासनाचाही समावेश करावा. तसेच वन विभागाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र सविस्तर भूमिका मांडण्यात येईल. यामध्ये केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या निकषाप्रमाणे व उच्चस्तरीय समितीने सुचविलेल्या सर्व मुद्द्यांचे निराकरण करण्यात येईल. हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरसह राज्य शासन एक पथक तयार करून आवश्यक ती सर्व मदत करेल. आवश्यक वाटल्यास रेस्क्यू सेंटरसारखी व्यवस्थाही करण्यात येईल व त्या प्रमाणे सुविधा देण्यात येतील आदी बाबींचा समावेश करून या बाबी तपासण्यासाठी सर्वोच्च न्यायालयास स्वतंत्र समिती नेमण्याची विनंतीही राज्य शासनामार्फत या याचिकेमध्ये करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तसेच या प्रकरणात नागरिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, वनमंत्री गणेश नाईक, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार धैर्यशील माने, खासदार विशाल पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील, अशोकराव माने, विश्वजीत कदम, राहुल आवाडेजी, राजेंद्रजी पाटील यड्रावकर, सदाभाऊ खोत, अमलजी महाडिक, माजी आमदार प्रकाश आवाडेजी यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी आणि नांदणी मठाचे पूज्य स्वस्तीश्री जिनसेन महास्वामी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.