मुंबई : मराठी चित्रपटांना आणि चित्रकर्मींना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून देण्यात येणारे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार व पारितोषिकांच्या वितरण सोहळ्याचे हीरक महोत्सवी पर्व मंगळवारी मुंबईतील डोम एसव्हीपी सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी ६० व्या आणि ६१ व्या राज्य मराठी चित्रपटविषयक पारितोषिकांचे, तसेच सन २०२४ करिता चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव व विशेष योगदान पुरस्कार आणि स्व. राज कपूर जीवनगौरव व विशेष योगदान पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार आणि छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्काराचेही वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावेळी महसूल व वने अपर मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, तसेच सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यासह चित्रकर्मी, चित्रपटरसिक आणि माध्यमकर्मी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ६० व्या व ६१ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सन २०२२ व सन २०२३ मध्ये प्रदर्शित मराठी चित्रपटांतील उत्कृष्ट कामगिरीसाठी विविध कार्यगटांतील पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. तसेच यावेळी चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा, तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने अभिनेत्री मुक्ता बर्वे यांचा गौरव करण्यात आला. तसेच स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्काराने ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना, तर स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने अभिनेत्री काजोल यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गझलगायक भिमराव पांचाळे यांना प्रदान करण्यात आला. तसेच यावर्षीपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये मानांकन मिळाल्याबद्दल राज्य शासनाकडून ‘छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार’ सुरू करण्यात आला आहे. या पुरस्काराने यावेळी युनेस्कोतील भारताचे राजदूत व स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा यांना तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचे जतन व संवर्धनासाठी प्रयत्नशील असलेल्या अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघास सन्मानित करण्यात आले.
60 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार – 2022
1. उत्कृष्ट कला दिग्दर्शन – महेश कुडाळकर (उनाड)
2. उत्कृष्ट छायालेखन – अभिजीत चौधरी / ओंकार बर्वे (4 ब्लाईन्ड मेन) व प्रियषंकर गोष (ह्या गोष्टीला नावच नाही)