बीजमाता राहीबाई पोपेरेंकडून भाऊ चंद्रकांत पाटील यांना बीज राखी… पाटील यांच्या कोथरुड निवासस्थानी रक्षाबंधन सोहळा साजरा

18

पुणे : बहीण -भावाच्या अनोख्या नात्याचा संगम म्हणजेच रक्षाबंधन. यादिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर त्याच्या सुरक्षेसाठी आणि दीर्घायुष्य आयुष्यासाठी राखी बांधते. अशा पवित्र दिवशी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना देखील एक खास राखी बांधण्यात आली आहे. गावरान बियाण्यांपासून तयार केलेली राखी. बीजमाता राहीबाई पोपरे यांनी प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही चंद्रकांत पाटील यांच्यासाठी गावरान बियाण्यांपासून राखी तयार केली. पाटील यांच्या कोथरुड येथील निवासस्थानी औक्षण करुन रक्षाबंधन सोहळा साजरा करण्यात आला. माझ्या हातून जनसेवेचे व्रत निरंतर घडत राहो, असा आशीर्वाद यावेळी राहीबाई यांनी दिला.

याबाबत चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली, गावरान बियाणांचे जतन व संवर्धनाचे मोठे काम पद्मश्री राहीबाई पोपरे सातत्याने करीत आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. दरवर्षी रक्षाबंधन सणासाठी त्या गावरान बियाणांपासून राख्या तयार करुन मला पाठवत असतात. त्यांचे हे कार्य अखंडितपणे सुरु राहो, ही सदिच्छा, पाटील यांनी व्यक्त केली.

अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे या खेड्यातून त्यांनी सीड बँक सुरू केली. या बँकेत आतापर्यंत 250 हून अधिक देशी वाणांच्या बियांचे संकलन व संवर्धन करण्यात आले आहे. याच क्षेत्रातील कामाबद्दल त्यांना बीजमाता म्हणून ओळख मिळाली. तसेच देशातील चौथ्या सर्वोच्च पुरस्काराने राहीबाईंना गौरवण्यात आले. राहीबाई यांच्याकडे अनेक जुन्या गावठी पालेभाज्या व वेलवर्गीय भाज्यांचे बियाणे जतन केलेले आहे. त्यांनी त्यांच्या सीड बँक मध्ये संवर्धन केलेले बियाणे इतर कोणत्याही आंतरराष्ट्रीय सीड कंपनी कडे उपलब्ध नाहीत.

Get real time updates directly on you device, subscribe now.