नामदार चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून कोथरूडमध्ये आयोजित आंतर सोसायटी एकांकिका स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून कोथरूडमध्ये आयोजित आंतर सोसायटी एकांकिका स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा आज यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सर्व विजेत्यांचे तसेच सहभागी सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, हौशी गायकांसाठी सप्टेंबर महिन्यात स्वतंत्र स्पर्धा आयोजित करण्याची घोषणाही यावेळी त्यांनी केली.
या सोहळ्यास केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, अभिनेते प्रशांत दामले, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ. संदीप बुटाला, कोथरुड मध्य मंडल अध्यक्ष निलेश कोंढाळकर, उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर, स्पर्धेचे परिक्षक यशोधन बाळ, भालचंद्र करंदीकर, अनुराधा राजहंस, संयोजक मधुरा वैशंपायन, अशुतोष वैशंपायन तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
कोथरुडमधील इंद्रधनू सोसायटीच्या ‘पापक्षालन’ या एकांकीकेने पहिले, तर सूस-पाषाण येथील कृष्ण-कमल सोसायटीच्या ‘मळभ’ आणि बाणेरच्या नंदन प्रॉसपेराने सादर केलेल्या “हिप्पोपोटेमसचे पोस्टमार्टम”ला द्वितीय पारितोषिक विभागून देण्यात आले. तिसरं पारितोषिक सृष्टी सोसायटीच्या ‘गुलाबी सिर’, बळवंत पूरम साम्राज्य ‘द कॉन्शन्स’ला विभागून देण्यात आले.
यावेळी मुरलीधर मोहोळ म्हणाले, कोथरुडने कलाक्षेत्राला अनेक दिग्गज कलावंत दिले आहेत. त्यामुळे कोथरुडकर मंडळी ही कलाकारच आहेत. कोथरुडने कलाक्षेत्राला अनेक दिग्गज दिले आहेत. त्यामुळे कोथरुडकर मंडळी ही कलाकार आणि दर्दी आहेत, हे सांगण्याची गरज नाही. आंतर सोसायटीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हे त्याचेच द्योतक आहे. सर्वसामान्यपणे लोकप्रतिनिधी निवडताना आपण सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवणाऱ्या व्यक्तीला निवडून देत असतो. मात्र, चंद्रकांतदादा हे केवळ त्यांच्या अडीअडचणीच सोडवतात असे नाही, तर मर्यादेच्या पलिकडे जाऊन काम करतात, ही त्यांची खासियत आहे, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.