शेतकऱ्यांच्या हक्क, प्रगती आणि उद्योग वृद्धीसाठी अशा मेळाव्यांचे महत्त्व अनन्यसाधारण – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली : वाळवा-शिराळा को-ऑप. डेअरी लि. (रेठरे धरण, ता. वाळवा, जि. सांगली) यांच्या वतीने आयोजित “नूतन संचालक निवड” आणि “भव्य दूध उत्पादक शेतकरी मेळावा” यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. शेतकऱ्यांच्या हक्क, प्रगती आणि उद्योग वृद्धीसाठी अशा मेळाव्यांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे यावेळी पाटील यांनी म्हटले.
या मेळाव्यास भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, आमदार सत्यजित देशमुखजी, आमदार प्रवीण दरेकर, आमदार सुरेश खाडे, माजी मंत्री अण्णाजी डांगे, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार भगवान साळुंखे, संघटनमंत्री मकरंद देशपांडे तसेच जन सुराज्य पक्षाचे सुमित कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वर्गीय वनश्री नानासाहेब महाडिक यांच्या पुतळ्यास अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. शेतकऱ्यांची उन्नती, दुग्ध व्यवसायाला चालना आणि सहकार चळवळीच्या बळकटीकरणासाठी भाजपा-महायुती सरकार हे सदैव कटिबद्ध आहे. हे सरकार जनसामान्य व शेतकऱ्यांचे असून त्यांना ते कधीही एकटे सोडणार नाही, अशी भावना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार प्रवीण दरेकर म्हणाले, सम्राट महाडिक युवा, आक्रमक नेते आहेत. श्रद्धा-सबुरीचे फळ काय असते त्याचे उत्तम उदाहरण सम्राट महाडिक आहेत. सम्राट महाडिक यांनी शेतकऱ्यांसाठी ही डेअरी स्थापन केलीय. हा प्रकल्प आणखी मोठा करायचा असेल तर मुंबई जिल्हा बँकेच्या माध्यमातून लागेल तो अर्थपूरवठा भविष्यात या प्रकल्पासाठी केला जाईल, असे आश्वस्त केले.