कु. यास्मिन खुर्शीद सर्वेअर यांनी महिलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या सामाजिक प्रगतीसाठी त्यांनी दाखवलेला मार्ग आजही प्रेरणादायी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : आशिया खंडातील पहिल्या महिला वाणिज्य पदवीधर कु. यास्मिन खुर्शीद सर्वेअर यांच्या पदवीप्राप्तीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सिडनहॅम महाविद्यालय, चर्चगेट, मुंबई येथे भव्य शताब्दी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कु. यास्मिन सर्वेअर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले. महिलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या सामाजिक प्रगतीसाठी त्यांनी दाखवलेला मार्ग आजही प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले. डॉक्टर होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये होणाऱ्या नाविन्यपूर्ण विविध कोर्सेस आणि उपक्रमांचे यावेळी पाटील यांनी कौतुक केले.
याप्रसंगी माजी विद्यार्थिनी व प्रसिद्ध पार्श्वगायिका संजीवनी भेलांडे यांनी इंग्रजीमध्ये अनुवादित केलेल्या मिराबाई यांच्या रचना सादर केल्या. याचे औचित्य साधून एका नवीन स्पर्धेची घोषणा केली. दर महिन्याला मीराबाईंची एक रचना संजीवनी भेलांडे देतील, त्याचे अर्थपूर्ण विवेचन स्वतःच्या आवाजात करणाऱ्या विद्यार्थी- विद्यार्थिनी यास पंचवीस हजारांचे रोख पारितोषिक पाटील यांनी जाहीर केले. आजच या उपक्रमाची सुरुवात केली. हजर असलेल्या विद्यार्थ्यांपैकी मीराबाईंच्या भजनाचे विवेचन करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना रुपये दहा हजार रोख बक्षीस यावेळी देण्यात आले.
या कार्यक्रमास मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी श्रीमती आंचल सूद गोयल, डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रजनीश कामत, प्रसिद्ध पार्श्वगायिका संजीवनी भेलांडे, सिडनहॅम महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीनिवास धुरु, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.