संजय राऊत यांनी अंगडियाचा धंदा सुरू केला आहे का?, भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा थेट सवाल

मुंबई : दिल्लीत दहा हजार कोटी रुपये ट्रान्सफर झाले असतील तर ते राऊत यांना कसं कळलं? त्यांनी अंगडियाचा नवा धंदा सुरू केला आहे का? की राऊत अंगाडियाकडे नोकर म्हणून काम करत होते? असे परखड प्रश्न करीत भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत खा. संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढविला.
संजय शिरसाट यांच्यावरील आरोपांवरून बन यांनी राऊतांना खडे बोल सुनावले. ते म्हणाले की, संजय शिरसाट यांच्यावर आरोप करायचे, पण न्यायव्यवस्थेत कुठेही तक्रार दाखल करायची नाही. खरे तर चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत पण फक्त माध्यमांसमोर वायफळ आरोप करणं, फक्त हवा तयार करणं हा राऊतांचा धंदा झालाय.
भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरूनही राऊत यांच्यावर ताशेरे ओढत बन म्हणाले की, पत्रा चाळ घोटाळ्याचे आरोप ज्यांच्यावर आहेत आणि ईडी कोर्टातून जामिनावर सुटलेले संशशित गुन्हेगार संजय राऊत भ्रष्टाचाराबद्दल बोलतात हे हास्यस्पद आहे. राऊत सतत या देशातील लोकशाही व्यवस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहेत असा घणाघात ही त्यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंगू आहेत या, राऊतांनी केलेल्या आरोपाचा समाचार घेताना बन म्हणाले, पंगू मुख्यमंत्री कोण होते हे महाराष्ट्राने पाहिलं आहे. वाझे काय लादेन आहे का? असं म्हणणारे, शंभर कोटींची वसुली सुरू असताना गृहखात्याच्या कारभारात बघ्याची भूमिका घेणारे तत्कालीन मुख्यमंत्री उबाठा हे पंगू होते, हे महाराष्ट्राने पाहिले आहे.
राऊत हे राहुल गांधींचे झिलकरी बनले
राहुल गांधींची भाषा जशी आहे तशीच भाषा राऊत बोलतात. राऊत हे राहुल गांधींचे झिलकरी बनल्याचे चित्र वारंवार दिसते आहे. काल राज्यपालांचं कौतुक करणारे राऊत, राहुल गांधींना भेटले की त्यांची भाषा लगेच बदलते आणि ते अचानक राज्यपालांवर टीका करतात. राहुल गांधींची किती हांजी हांजी करणार, असा थेट सवालही बन यांनी केला.