पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संभाव्य पूरस्थितीचा घेतला आढावा… संभाव्य पूरस्थितीत सुसूत्र समन्वयाव्दारे सांघिक आपत्ती व्यवस्थापन करण्याच्या दिल्या सूचना

37

सांगल : कोयना व वारणा धरणातील वाढता विसर्ग पाहता सांगलीत कृष्णा नदीतील पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमिवर संभाव्य पूरस्थितीचा आढावा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दूरध्वनीद्वारे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडून घेतला.

संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने यंत्रणांनी प्रभावी नियोजन करून सज्ज राहावे. सर्व यंत्रणांनी 24 तास सतर्क राहावे. जलसंपदा विभागाने पूरस्थितीच्या अनुषंगाने पाण्याची आवक व विसर्ग याबाबत आलमट्टी धरण व्यवस्थापनाशी योग्य तो समन्वय ठेवावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. संभाव्य पूरस्थितीत सुसूत्र समन्वयाव्दारे सांघिक आपत्ती व्यवस्थापन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

2019 च्या पुराचा अनुभव लक्षात घेऊन सर्व संबंधित यंत्रणांनी गांभीर्याने, जबाबदारीने परस्पर समन्वय ठेवावा. गरजेनुरूप आवश्यक ती पूर्वतयारी व कार्यवाही करावी. नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवावेत. त्या ठिकाणी जबाबदार व्यक्तिंची नेमणूक करावी. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने आवश्यक ती तयारी ठेवावी. संभाव्य पूरस्थिती उद्‌भवल्यास नागरिकांचे व पशुधनाचे स्थलांतर, सुस्थितीतील निवारा केंद्रे व तेथे आवश्यक सुविधा, भोजन आदिंबाबत खात्री करावी आदि सूचना केल्या.

चंद्रकांत पाटील यांनी नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरून जावू नये. संभाव्य पूरस्थिती हाताळण्यास जिल्हा प्रशासन सज्ज असून, पालकमंत्री म्हणून आपण परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घेत आहोत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पाटील यांनी दुरध्वनीद्वारे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता सी. एच. पाटोळे यांच्याकडून कोयना व वारणा धरणातून होणारा विसर्ग, त्यानुरूप नदीकाठच्या गावांनी सतर्क राहून घ्यावयाची काळजी याबाबतचा आढावा घेतला. तसेच, पूरस्थितीच्या अनुषंगाने जलसंपदा विभागाने पाण्याची आवक व विसर्ग याबाबत आलमट्टी धरण व्यवस्थापनाशी योग्य तो समन्वय ठेवावा, असेही सूचित केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.