भारतीय सैन्याचा अपमान केल्याबद्दल राऊत यांनी माफी मागावी, भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची मागणी

मुंबई : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांशी संवाद साधण्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवली आहे. त्यानुसार फडणवीस यांनी विरोधी नेत्यांशी संवाद साधला. फडणवीस यांच्या चाणक्यनीतीचा पूर्वानुभव असल्याने औरंगजेब फॅन क्लबचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या पायाखालची जमीन सध्या सरकली आहे, अशा शब्दात भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले. भाजपा प्रदेश कार्यालयात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पहलगाम हत्याकांडातील अतिरेक्यांना भारतीय सैन्याने ठार करूनही पाकिस्तानचे प्रवक्ते असल्याप्रमाणे राऊत हे अतिरेकी जिवंत असल्याचा दावा करून भारतीय सैन्याच्या शौर्याचा अपमान करतात त्याबद्दल त्यांनी समस्त भारतीयांची माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली.
यावेळी बन म्हणाले की, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विविध पक्षांशी संपर्क साधण्याची जबाबदारी असलेल्या फडणवीस यांनी ”मविआ”च्या नेत्यांशी संपर्क साधल्याने राऊतांची चिडचिड झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चाणाक्यनीतीचा साक्षात्कार तीन वर्षांपूर्वी राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत दिसला आहे, म्हणूनच डोके ठिकाणावर नसलेल्या राऊतांनी बेताल बडबड चालू केली आहे. महाराष्ट्राचे पहिले नागरिक असलेल्या राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना सौजन्य दाखवून पाठिंबा द्यायला हवा होता, मात्र संजय राऊत ते करणार नाहीत. मविआचा पत्त्यांचा बंगला कोसळणार असून उरलेसुरले तुमचे खासदार तुमच्या सोबत राहतात का, हे आधी बघा. असा टोलाही त्यांनी राऊत यांना लगावला.
जावेद मियांदादला बिर्याणी खाऊ घालणाऱ्यांनी भाजपाला राष्ट्रवाद शिकवू नये भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याबाबत भारताची स्पष्ट भूमिका आहे. ना पाकिस्तानचे खेळाडू भारतात येणार, ना भारत पाकिस्तानात जाणार. करार आणि आशिया कप स्पर्धेचे स्वरूप वेगळे असले तरी राष्ट्रवाद काय असतो हे संजय राऊत यांनी शिकवू नये अशी बोचरी टीका बन यांनी केली.
रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देत बन म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे बहुजन समाजाचे नेते आहेत. 18 पगड जातींना सोबत घेऊन जाण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे. एका वर्तमानपत्राने तद्दन खोटी बातमी दिली आहे. सर्वच महामंडळांना समान वागणूक आणि निधी देण्याचे काम महायुती सरकार करत आहे. आमचे काम सबका साथ, सबका विकास या तत्वावर आधारित आहे. तरीसुद्धा रोहित पवार जाणीवपूर्वक खोटी टीका करत असल्याचेही ते म्हणाले.
रोहित पवारांनी रा. स्व. संघाचा इतिहास समजून घ्यावा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या टीकेचा समाचार घेताना बन यांनी राऊत यांना लक्ष्य केले. सामाजिक आणि वैचारिक अस्पृश्यता दूर करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातत्याने कार्यरत आहे. मग शरद पवार गटाला आणि रोहित पवार यांना संघामुळे एवढी मिर्ची का लागते? रोहित पवार यांनी संघाचा इतिहास समजून घ्यावा. एका धर्मियाचे लांगूलचालन करण्यापेक्षा संघाच्या व्यासपीठावर येणे समाजासाठी चांगले आहे अशी खोचक टिप्पणी बन यांनी केली. महात्मा गांधी, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एपीजे अब्दुल कलाम, प्रणव मुखर्जी हे नेते सुद्धा संघाच्या व्यासपीठावर आले होते याचीही आठवण त्यांनी करून दिली.