शासकीय व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

सांगली : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, मिरज येथे अद्ययावत व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राचे आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन संपन्न झाले. सांगली जिल्हा अमली पदार्थ मुक्तीच्या दिशेने महत्त्वाचे ठरणारे अद्ययावत यंत्रसामुग्रीने युक्त अशा व्यसनमुक्ती केंद्र व पुनर्वसन केंद्राचे आज लोकार्पण करण्यात आले. या केंद्रातून व्यसनाधीन लोकांवर अद्ययावत उपचार मोफत केले जाणार आहेत. याचा लाभ घेऊन जिल्हा अमली पदार्थ मुक्त करण्याच्या चळवळीत योगदान द्यावे, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी आज केले.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, मानसोपचार विभाग प्रमुख डॉ. राजकिरण साळुंखे, सहयोगी प्राध्यापक डॉ. महेश कुंभार, आदि उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्या दौऱ्यात प्रजासत्ताक दिनी मी सांगली जिल्हा अमली पदार्थ मुक्त करण्याचा संकल्प केला. त्या दृष्टीने प्रबोधन, कायद्याचा धाक आणि उपचार या त्रिसूत्रीतून आम्ही काम सुरू केले. प्रबोधनामध्ये जिल्हा परिषदेंतर्गत विविध माध्यमातून स्पर्धा घेऊन प्रबोधन केले. भावी पिढीला हा विळखा बसू नये, म्हणून अनुदानित शाळेत दररोज परिपाठाच्या वेळी अमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा घेतली जाण्याची कार्यवाही सुरू आहे. कायद्याचा धाकही पोलीस दलाने निर्माण केला. यातील तिसरा टप्पा म्हणजेच अद्ययावत यंत्रसामुग्रीने युक्त असे व्यसनमुक्ती केंद्राचे आज लोकार्पण करत आहोत. या केंद्रामध्ये व्यसनाधीन लोकांवर यावर अद्ययावत पद्धतीने मोफत उपचार केले जाणार आहेत. या केंद्रामध्ये उपचार घेणारे व्यसनाधीन व्यक्ति व त्यांच्या नातेवाईकांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी या व्यसनमुक्ती केंद्रासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. तसेच, अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी सखोल अभ्यास करून हे केंद्र कार्यान्वित केल्याचे श्रेय चंद्रकांत पाटील यांनी त्यांना दिले.
या केंद्रात मानसोपचार विभाग प्रमुख डॉ. राजकिरण साळुंखे, सहयोगी प्राध्यापक डॉ. महेश कुंभार आणि डॉ. विक्रांत हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली नर्सिंग अधिसेविका वंदना शहाणे, मानसोपचार तज्ज्ञ परिसेविका प्रिया राऊळ आणि प्राजक्ता काकडे यांची टीम उपचार करणार आहे. हे उपचार केंद्र अद्ययावत यंत्रांनी सुसज्ज असून, या केंद्रात मॉडिफाइड इसीटी मशीन, मल्टी बिहेवियरल थेरपी’ मशीन, अव्हर्जन थेरपी मशीन, सेरेब्रल स्टिम्युलेशन मशीन, क्रॅनियल नर्व्ह स्टिम्युलेशन मशीन आणि रिपीटेटिव्ह ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन म्हणजेच आरटीएमएस मशीनच्या अशा अद्ययावत यंत्रांच्या सहाय्याने उपचार केले जाणार आहेत. खाजगी रूग्णालयात अशी उपचार पद्धती महागडी असते. पण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, मिरज येथे अद्ययावत व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रामध्ये व्यसनाधीनांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. असा उपक्रम करणारा सांगली जिल्हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.
अमली पदार्थ व्यसनामुळे अनेक मानसिक विकार निर्माण होतात. या व्यसनमुक्ती केंद्रात ओपिओइड्स : ब्राऊन शुगर, हेरॉइन, सायकोस्टिम्युलंट्स कोकेन, मेथाम्फेटामिन, एमडी, कॅनाबिस पदार्थ: गांजा, चरस, सिंथेटिक ड्रग्स: LSD, MDMA, स्निफिंग सोल्युशन, व्हाइटनर, झोपेच्या गोळ्या यातील व्यसनाधीन व्यक्तिंवर उपचार केले जाणार आहेत. गटचिकित्सा आणि कौटुंबिक समुपदेशन या दोन पद्धतीने उपचार केले जातील. नातेवाईकासोबत राहून उपचार घेण्याची सोय असून, औषधोपचार, मानसोपचार पद्धती, CBT (Cognitive Behavioural Therapy): विचार व वर्तन सुधारणे व Motivational Interviewing (MI): रुग्णाला उपचारासाठी तयार करणे या चार टप्पात उपचार केले जातील.