मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमुळे गुन्हेगारी तपासास गती – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

16

सांगली : गुन्ह्यांचा छडा लावून शिक्षेचे प्रमाण वाढवण्यासाठी पोलीस दलाला अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त साधनसामग्री देण्याची कार्यवाही सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून सांगली पोलीस दलास अद्ययावत मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन व त्यासोबत प्रशिक्षित मनुष्यबळ दिले आहे. यामुळे गुन्हेगारी तपास वैज्ञानिक पद्धतीने व अधिक सक्षमतेने करण्याच्या दिशेने सांगली जिल्हा पोलीस दलाला मोठी ताकद प्राप्त झाली आहे, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण, तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

पोलीस दलास प्राप्त मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन व दोन आयशर बसचे लोकार्पण पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात आयोजित या कार्यक्रमास आमदार सुधीर गाडगीळ, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सांगली विमला एम., उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज प्रणिल गिल्डा, पोलीस उपअधीक्षक प्रभाकर मोरे, पोलीस उपअधीक्षक (गृह) अरूण सुगावकर, मा. पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, पोलीस विभागाची वाहतूक व्यवस्था चांगली होण्यासाठी दोन अद्ययावत बसेस सांगली पोलीस दलाच्या ताफ्यात आल्या आहेत. गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी घटनास्थळावरून अनेक नमुने घ्यावे लागतात. त्यासाठी फॉरेन्सिक व्हॅन व प्रशिक्षित मनुष्यबळ दिले आहे. तसेच, या व्हॅनमध्ये सर्व गोष्टी अद्ययावत आहेत. अमली पदार्थ सापडले तर त्याचे वेगवेगळे प्रकार तपासण्यासाठी त्यामध्ये किट आहे. तसेच, सीसीटीव्ही असल्यामुळे गुन्ह्याच्या ठिकाणी नमुने घेताना त्याचे व्हीडिओ रेकॉर्डिंग करता येते. या अद्ययावत साधने व सुविधांमुळे गुन्हा घडल्यानंतर आरोपपत्र लवकर तयार होऊन प्रकरण लवकर निकाली लागून शिक्षा होण्याचे प्रमाण वाढेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये असणारे विविध किट, त्याचा उपयोग याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे व व्हॅनसाठी नियुक्त प्रशिक्षित स्टाफ यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक भैरु तळेकर व सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम, राखीव पोलीस निरीक्षक श्री. अलदर, अंगुलीमुद्रा विभागाकडील सहायक पोलीस निरीक्षक प्रियांका संकपाळ तसेच पोलीस विभागाचे अधिकारी, अंमलदार उपस्थित होते.

गुन्ह्यांचे बदलत जाणारे स्वरूप व त्यामुळे तपासामध्ये येणाऱ्या आव्हानांना आता वैज्ञानिक पुराव्यांची भक्कम साथ मिळण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 कायद्याच्या अंमलबजावणीकरिता महाराष्ट्र राज्यात एकूण 259 मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्स सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सांगली जिल्ह्याकरिता दि. 26 ऑगस्ट 2025 रोजी नव्याने अद्ययावत पद्धतीचे फॉरेन्सिक व्हॅन वाहन पुरविण्यात आले आहे. सदर व्हॅन सीएमएस कॉम्प्युटर्स इंडिया प्रा.लि. यांच्यामार्फत पुरवण्यात आले असून कंपनीमार्फत एक्सपर्ट व केमिकल अनॅलायजर पुरवण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे या अत्याधुनिक व्हॅनसोबत घटनास्थळावरील भौतिक पुरावे गोळा करण्यासाठी 16 विविध टेस्टींग किटस् पुरवण्यात आलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने ब्लड डिटेक्शन किट, एनडीपीएस किट, जीएसआर टेस्टींग किट, सायबर क्राईम इन्वेस्टीगेशन किट, डीएनए किट इत्यादी प्रकारच्या महत्त्वाच्या किटस् चा समावेश करण्यात आलेला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.