जीएसटी परिषदेच्या बैठकीत सर्वसामान्यांना दिलासा देणारे धाडसी निर्णय घेण्याची इच्छाशक्ती दाखविल्याबद्दल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोदी सरकारचे मानले आभार

मुंबई : जीएसटी परिषदेच्या बैठकीत बुधवारी अत्यंत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. चार स्तरीय रचना रद्द करण्यात आली असून द्विस्तरीय रचना अमलात आणली जाणार आहे. १२% आणि २८% जीएसटी स्लॅब वगळण्याचा निर्णय परिषदेने घेतला असून २२ सप्टेंबर २०२५ पासून ५% आणि १८% असे दोन स्लॅब असणार आहेत. या निर्णयामुळे कपडे आणि पादत्राणे, सायकली, दुचाकी, छोटी वाहने, बसेस आणि ट्रक, औषधे, चष्मे, आरोग्य विमा तसेच आयुर्विमा स्वस्त होणार असून सर्वासामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जीएसटी रचना आणखी सुटसुटीत आणि सुलभ होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
चंद्रकांत पाटील यांनी आपल्या सोशल साईटवर जीएसटी परिषदेच्या बैठकीबाबत माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात जीएसटी आकारणी सुलभ करण्याचे संकेत दिले होते. संसद सभागृहातही त्याचा पुनरूच्चार करण्यात आला होता. आणि परिषदेच्या आजच्या बैठकीत त्याची फलश्रुती झाली. दोन स्तरीय आकारणीमुळे हजारो कोटींच्या महसूलाला सरकारला मुकावे लागणार आहे, मात्र त्याचा थेट फायदा सामान्य नागरिकांना होणार आहे.
सर्वसामान्यांना दिलासा देताना धाडसी निर्णय घेण्याची इच्छाशक्ती दाखविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि समस्त जीएसटी परिषदेला पाटील यांनी मनःपूर्वक धन्यवाद दिले.