युवा टेनिसपटू, अर्जुन पुरस्काराने सन्मानित अंकिता रैनाची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली भेट

पुणे : क्रीडाक्षेत्रात भारताच्या लेकींची भरारी थक्क करणारी आहे. अलीकडच्या काळात जवळपास सर्वच क्रीडाप्रकारात भारतीय मुलींनी झेंडा रोवला आहे. 2018 पासून भारतीय क्रमवारीत अव्वल मानांकित आणि जागतिक स्तरावर दबदबा निर्माण करणारी युवा टेनिसपटू, अर्जुन पुरस्काराने सन्मानित अंकिता रैनाची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली.
अंकिता हा जबरदस्त इच्छाशक्तीचा जिवंत झराच. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या अंकिता रैनाने अनेक आर्थिक अडचणींवर मात करुन, यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत. आता ती पुण्याची रहिवासी असल्याने तिचा काकणभर अधिक अभिमान वाटतो, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. ऑलिम्पिक, आशियाई क्रीडा स्पर्धा मध्ये तिने भारताचे प्रतिनिधित्व केले. आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकण्याची कामगिरी अंकिताने केलीय. 2014, 2018 आणि 2022 असे सलग तीनवेळा तिने भारताचे प्रतिनिधित्व केले. दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत एकल आणि दुहेरी मध्ये ती सुवर्ण पदकाची मानकरी आहे. तिने एकल 11 आंतरराष्ट्रीय आणि 30 दुहेरी स्पर्धा जिंकल्या आहेत. इतकी जबरदस्त कामगिरी करणाऱ्या या सुकन्येला भेटण्याचा आज सुवर्णयोग होता. तिची सर्व स्वप्ने पूर्ण होवो आणि तिच्या उत्तुंग कामगिरीने भारताच्या नावलौकिकात भर पडो, अशी भावना व्यक्त करुन तिला तिच्या पुढील वाटचाली पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी तिने स्वतःची टेनिस रॅकेट आपल्या स्वाक्षरीने पाटील यांना भेट म्हणून दिले. याच रॅकेटने तिने ऑलिम्पिक स्पर्धा गाजवली होती. आपल्या आयुष्यात आपण जागतिक पातळीवरच्या ज्या सर्वोच्च व्यासपीठावर पोहोचलो त्याची साक्षीदार असणारी ही रॅकेट अंकितासाठी प्राणप्रिय असणे स्वाभाविक आहे. या अनमोल भेटीबद्दल पाटील यांनी तिचे मनापासून आभार मानतो. तिची ही भेट सदैव स्फूर्ती देत राहील, असे पाटील यांनी म्हटले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, आम्ही राजकारण आणि समाजकारण करणारी माणसं. पण अशा वेगळ्या वाटेवरच्या माणसांशी भेट झाली की रोजच्या रहाटगाडग्यातून विरंगुळा मिळतो. एक वेगळी ऊर्जा मिळते. अंकिता एका छोट्या भेटीत आज प्रचंड ऊर्जा देऊन गेली आणि दिवस सत्कारणी लागला. विश्वविजयी कामगिरीसाठी अंकिताला माझे भरभरून आशीर्वाद आणि शुभेच्छा!, अशा भावना पाटील यांनी व्यक्त केल्या.