उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत दिला बाप्पाला भावपूर्ण निरोप

पुणे : पुण्यातील विसर्जन मिरवणूक वैशिष्ट्यपूर्ण असते. या मिरवणुकीत पुणेकरांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो. पुण्यातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या सुरुवातीला लोकमान्य टिळक आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या बेलबाग चौकातील पुतळ्यांस केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. शनिवारी सुरु झालेल्या विसर्जन मिरवणुकीत भाजपचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
अनंत चतुर्दशी… आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवस. पुण्यातील मानाचा पहिला गणपती म्हणजे कसबा गणपतीचे चंद्रकांत पाटील यांनी दर्शन घेऊन भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करताना, गणरायाची कृपा सदैव सर्व भक्तांवर राहो, ही प्रार्थना त्यांनी केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह पालखीचा भोई होण्याचे भाग्य त्यांना लाभले.
पुण्यातील मानाचा दुसरा गणपती म्हणजेच तांबडी जोगेश्वरी, मानाचा तिसरा गणपती म्हणजेच गुरुजी तालीम, मानाचा चौथा गणपती म्हणजेच तुळशीबाग, मानाचा पाचवा गणपती अर्थात केसरीवाडा या मनाच्या पाचही गणपतीचे दर्शन घेऊन भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला. समस्त पुणेकरांना सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य, दे अशी श्री चरणी पाटील यांनी प्रार्थना केली. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधरजी मोहोळ यांच्यासह गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.