महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न तज्ञ समितीची मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न

मुंबई : मंत्रालय, मुंबई येथे महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर तज्ञ समितीची बैठक आज आयोजित करण्यात आली. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत सीमा प्रश्नासंदर्भातील महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. तज्ञ समितीने घेतलेले निर्णय आता उच्चाधिकार समिती म्हणजेच हाय पावर कमिटीसमोर मांडण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले. याशिवाय तज्ञ समितीची बैठक दर तीन महिन्यांनी नियमित घेण्याचेही ठरले. तसेच सीमा भागातील नागरिकांच्या समस्या थेट मांडण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असून, मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून केंद्र शासनाकडे या समस्या सोडवण्यासाठी विनंती करण्यात येईल, असेही बैठकीत ठरले.
बैठकीदरम्यान विशेषतः सीमा भागातील मुलांच्या शिष्यवृत्तीच्या प्रश्नांवर तसेच उच्च तंत्र शिक्षण महाविद्यालयांना मिळणाऱ्या अनुदानाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी सर्वोच्च न्यायालयात दाखल दाव्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. सीमा भागातील मराठी भाषिक नागरिकांना येणाऱ्या अडचणी, त्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि प्रशासनिक समन्वय यावरही उहापोह करण्यात आला.
बैठकीस खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, अँड शिवाजी जाधव आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.