आपलं व्यावसायिक क्षेत्र सांभाळून समाजकार्यासाठी असामान्य कार्य उभं राहू शकतं, हे नाम फाऊंडेशनने प्रेरणादायी उदाहरण म्हणून दाखवून दिलं – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

6

पुणे : अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम फाउंडेशन’चा दशकपूर्ती सोहळा पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच इथं पार पडला. या सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भाटकर, मंत्री उदय सामंत, आमदार भीमराव तापकीर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. 2015 मध्ये नाम फाउंडेशनची स्थापना झाली आणि आज या फाऊंडेशनची दशकपूर्ती होत आहे. नाम फाऊंडेशनच्या दशकपूर्ती सोहळ्यास उपस्थित राहून चंद्रकांत पाटील यांनी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळी आपले मत व्यक्त करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, आपलं व्यावसायिक क्षेत्र सांभाळून समाजकार्यासाठी असामान्य कार्य उभं राहू शकतं, हे नाम फाऊंडेशनने प्रेरणादायी उदाहरण म्हणून दाखवून दिलं आहे. अशा सामाजिक उपक्रमांनी एका भागापुरते मर्यादित न राहता व्यापक स्तरावर पोहोचावे, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सरकारी योजना पोहोचवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांची साखळी निर्माण झाली पाहिजे, अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली.

यावेळी नाना पाटेकर म्हणाले, मकरंद माझ्यापेक्षा गावगाड्यात खूप फेमस आहे. गावाशी त्याची नाळ जोडलेली आहे. नाम फाऊंडेशनला दहा वर्षे पूर्ण झाली, याचा मला आनंद आहे. समाजाला आपण काहीतरी देणं लागतो म्हणून ही चळवळ सुरू झाली. हे फाऊंडेशन म्हणजे माणसांनी माणसांसाठी सुरू केलेली एक चळवळ आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून 60 लाख शेतकरी बांधवांना फायदा झाला. अनेक शेतकऱ्यांच्या फायद्याची कामं ‘नाम’तर्फे झाली आहेत, असे नाना म्हणाले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले, “जो सामाजिक काम करतो, त्याला राजकीय प्रचार करण्याची गरज पडत नाही. मी एखादा प्रोजेक्ट करताना सरकारला दूर ठेवतो. सरकारचा हात लागला की प्रॉब्लेम सुरू होतात. त्यामुळे मी त्यांना हात लावू देत नाही. प्रत्येक राजकारणी हा पुढच्या निवडणुकीबद्दल विचार करतो, तर प्रत्येक समाजसेवक हा पुढच्या समाजाच्या घटकाबद्दल विचार करतो. त्यामुळे आपला जॉब हा थँकलेस आहे,” असं ते म्हणाले.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.