मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या ग्रंथालय व संगणक अभियांत्रिकी विभागाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन संपन्न

पुणे :पुणे येथील सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातील नवीन ग्रंथालय आणि संगणक अभियांत्रिकी इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. या उद्घाटन कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या सात मजली इमारतीत पहिले तीन मजले ग्रंथालयासाठी आणि उर्वरित चार मजले संगणक अभियांत्रिकी विभागासाठी विकसित करण्यात आले आहेत. या अत्याधुनिक ग्रंथालयात गेल्या १०० वर्षांतील मौल्यवान साहित्य, संदर्भग्रंथांचे जतन तसेच आधुनिक डिजिटल साधने, सहयोगी अध्ययनाची साधने आणि संशोधनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे हे केंद्र पुढील पिढीसाठी ज्ञान आणि नवसृजनाचे महत्त्वाचे ठिकाण ठरणार आहे.
देशातील उच्च व तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना नव संशोधन आणि सक्षम मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी स्वायतत्ता देणे ही काळाची गरज असून त्यादृष्टीने केंद्र व राज्य पातळीवर शासनातर्फे प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. स्वायतत्ता मिळाल्यामुळे सीओईपीसारख्या संस्था जागतिक स्तरावर भागीदारी करू शकतील, तंत्रज्ञान देवाण-घेवाण व सहयोगी संशोधन करू शकतील. यामुळे महाराष्ट्राची ३ ट्रिलियन आणि भारताची ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करताना सक्षम मानव संसाधनाचा सेतू उभा राहील. आगामी काळात अधिकाधिक संस्थांना स्वायतत्ता देण्याचा राज्य शासनाचा धोरणात्मक निर्णय आहे,असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या विस्तारासाठी चिखली येथे २८ एकर जागा दिली आहे. अशा संस्थांना अधिक सक्षम करण्यासाठी शासन स्तरावरून मदत केली जाईल. तसेच संशोधन उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. भारतातील प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ संस्था म्हणून सीओईपीकडे बघितले जाते. या संस्थेला १७२ वर्षांचा इतिहास असून २०२८ मध्ये संस्थेला १७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. हा भारताच्या शैक्षणिक इतिहासातील विलक्षण प्रवास आहे. सीओईपीमधून शिक्षण घेऊन आज विविध क्षेत्रात माजी विद्यार्थी कार्यरत असून समाजातील सर्व क्षेत्रांना समृद्ध करण्याचे कार्य ते करत आहेत.
चंद्रकांत पाटील म्हणाले, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवीन शैक्षणिक धोरणात भारतीय ज्ञानपरंपरेचा समावेश झाला आहे. यामध्ये संशोधन, पेटंट व रॉयल्टी यावर भर देण्यात आला आहे. २०४७ मध्ये विकसित भारतामध्ये या बाबींचे योगदान महत्त्वाचे राहील. सीओईपीसारख्या संस्थांचे बळकटीकरण करण्यास शासन सहकार्य करेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यंदाचा जीवन गौरव पुरस्कार ए.आर.डी.ई.च्या माजी शास्त्रज्ञ श्रीमती वसंथा रामास्वामी यांना देण्यात आला. सीओईपी अभिमान पुरस्कार विलास जावडेकर डेव्हलपर्स, पुणेचे संस्थापक व अध्यक्ष विलास जावडेकर, एएसएमईचे माजी अध्यक्ष डॉ. महांतश हिरेमठ, स्ट्रडकॉम कन्सल्टंट्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक जयंत इनामदार, जेएनपीएचे अध्यक्ष उमेश वाघ , इलेक्ट्रोमेक मटेरियल हँडलिंग सिस्टीम्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक तुषार मेहेंदळे आणि महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.चे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हार्डीकर यांना प्रदान करण्यात आला.
सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातील नव्याने बांधलेल्या ग्रंथालय व संगणक अभियांत्रिकी विभागाच्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.
१५० वर्षांचा अभिमानास्पद वारसा असलेले केंद्रीय ग्रंथालय आता आधुनिक, विशेष उद्देशाने उभारलेल्या इमारतीत स्थलांतरित झाले आहे. हे ग्रंथालय ४ हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाची गरज भागवेल. येथे गेल्या शतकातील मौल्यवान साहित्य, संदर्भग्रंथांचे जतन, आधुनिक डिजिटल साधने, सहयोगी अध्ययन व संशोधनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
उद्घाटन समारंभाला पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सीओईपीचे कुलगुरू प्रा. सुनील भिरुड, नियामक मंडळ अध्यक्ष विनायक पै, सदस्य भरत गिते आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.