उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन

पुणे : आपल्या लेखनातून विशेषतः ऐतिहासिक कादंब-यांच्या माध्यमातून मराठी साहित्य रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रतिभावंत लेखक विश्वास पाटील यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. याबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.
विश्वास पाटील यांच्या विचारांनी, प्रतिभेने आणि नेतृत्वाने मराठी साहित्यक्षेत्राला नवी दिशा आणि प्रेरणा मिळो,अशी सदिच्छा चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
विश्वास पाटील हे मराठी साहित्यातील एक प्रसिद्ध व लोकप्रिय कादंबरीकार आहेत. त्यांनी ऐतिहासिक, सामाजिक व राजकीय विषयांवर आधारित अनेक प्रभावी कादंबऱ्या लिहिल्या आहेत. विश्वास पाटील यांची ‘पानिपत’ ही प्रचंड गाजलेली कादंबरी आहे. पाटील यांनी आपल्या दमदार लेखणीतून वैविध्यपूर्ण आणि कसदार साहित्यकृतीची निर्मिती केली आहे. पानिपत सारख्या ऐतिहासिक कादंबरीसाठी त्यांनी प्रचंड अभ्यास केला. विविध ऐतिहासिक ग्रंथ, दस्तऐवज, पत्रव्यवहार, तसेच तत्कालीन स्थलदर्शन यावर आधारित तपशील त्यांनी कथानकात गुंफले आहेत. यामुळे त्यांची लेखनशैली तथ्यपूर्ण, विश्वासार्ह आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्वपूर्ण ठरते.
आगामी साहित्य संमेलन हे यावेळी साताऱ्यात होणार आहे. त्यामुळे साताऱ्याच्या साहित्यप्रेमींसाठी मोठी पर्वणी असणार आहे. साताऱ्यातील शाहू स्टेडियम येथे साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात येणार आहे.