महिला व बाल विकास विभागाने महिलांना उद्योगासाठी प्रोत्साहित करावे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

6

सांगली :उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक संपन्न झाली. या बैठकीत महिला व बाल विकास विभागाने महिलांना उद्योगासाठी प्रोत्साहित करावे, तसेच महिलांनी जिल्ह्यात छोटे‑मोठे उद्योग सुरू करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राने प्रयत्न करावेत, असे निर्देश दिले. तसेच, महाविद्यालयीन युवतींना ‘कमवा आणि शिका’ या तत्त्वावर शिक्षणासाठी मदत म्हणून प्रायोगिक स्वरूपात विलिंग्डन महाविद्यालय परिसरात एक युनिट सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी पाटील यांनी दिल्या.

चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्हा उद्योग केंद्राने जिल्ह्यात उद्योग वाढविण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती, सामूहिक प्रोत्साहन योजना अशा विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करावेत. सामूहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत महिलांना माहिती देऊन उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करावेत. ज्या या योजना 5 टक्के बीज भांडवल, 35 टक्के अनुदान व उर्वरित कर्ज अशा स्वरूपात राबवल्या जातात. उद्योगाची मर्यादा एक लाख रूपये असणाऱ्या उद्योगासाठी आपण स्वत: बीज भांडवलाची रक्कम उभा करून देऊ, असे त्यांनी आश्वासीत केले. तसेच, महाविद्यालयीन युवतींनाही कमवा व शिका या तत्त्वावर शिक्षणासाठी मदत म्हणून प्रायोगिक तत्त्वावर विलिंग्डन महाविद्यालय परिसरात एखादे युनिट सुरू करण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात जिल्हा उद्योग केंद्राकडील विविध योजनांच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, मा. पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदि उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.