“मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ संपन्न… आपल्या गावचा डंका केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात वाजवू या – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांगले ता. शिराळा येथे शुभारंभ केला . यावेळी पाटील यांनी उपस्थितांना ऑनलाइन शुभेच्छा दिल्या.
गावातील प्रत्येक घरातील नागरिकाने आपल्या क्षमतेनुसार योगदान दिल्यास मांगले गाव महाराष्ट्रातच नव्हे तर देशपातळीवर आदर्श ठरेल, अशी भावना यानिमित्ताने चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. या अभियानाला आपले स्वतःचे अभियान समजून पूर्ण ताकदीने पुढे चला. आपल्या गावचा डंका केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात वाजवू या, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी ग्रामस्थाना केले.
ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले असून, या ग्रामसभेतून राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ग्रामस्थांना पाहता यावे यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाकडून १७ सप्टेंबरपासून ‘‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत व्यापक स्तरांवर प्रचार व प्रसार उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत पंचायत राज संस्थांच्या माध्यमातून ग्रामविकासाला गती देणे, ग्रामपंचायतींना सक्षम व आत्मनिर्भर बनविणे, सुशासन तत्त्वांची अंमलबजावणी करणे तसेच ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग वाढविणे ही प्रमुख उद्दिष्टे ठेवण्यात आली आहेत.