पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा २१ वा दीक्षांत सोहळा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखात संपन्न

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा २१ वा दीक्षांत सोहळा आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखात पार पडला. या सोहळ्यात पाटील यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला गोवा उच्च शिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. गोपाल मुगेराया, कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महावर, प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, परिक्षा मूल्यांकन मंडळ संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, प्र-कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांच्यासह विद्यापरिषद सदस्य, अधिसभा सदस्य, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुणवंत विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिकच नव्हे तर सामाजिक आयुष्यातही योगदान द्यावे, समाजकल्याणासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करावा, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले. यंदाच्या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात मुलींनी सुवर्णपदके पटकावली ही आनंदाची बाब आहे. तसेच सोलापूर विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवण्यासाठी आवश्यक सुधारणा व धोरणे राबविली जाणार असल्याचा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.
यावर्षी 89 विद्यार्थ्यांना पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली . त्याचबरोबर यंदा 59 विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत. विविध विषयात गुणानुक्रमे प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना देणगीदारांनी दिलेल्या रकमेतून सुवर्णपदक देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. अशा एकूण 59 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये 15 मुले तर 44 मुलींचा समावेश आहे.