पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा ऑनलाइन लिलाव सुरु… या लिलावात सहभागी व्हा आणि “नमामि गंगे” योजनेला हातभार लावा, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध सरकारी कार्यक्रम आणि दौऱ्यांमध्ये आपल्याला मिळालेल्या भेटवस्तूंचा ऑनलाइन लिलाव सुरु झाल्याचे सांगून नागरिकांना लिलावात सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या लिलावातून मिळणारी रक्कम, गंगा नदीचे संवर्धन आणि पुनरुज्जीवनासाठी भारताचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असलेल्या ‘नमामि गंगे’ उपक्रमासाठी वापरली जाईल, असे त्यांनी नमूद केले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील या लिलावात सहभागी व्हा आणि “नमामि गंगे” योजनेला हातभार लावा, असे आवाहन केले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी अप्लाय सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले , सामाजिक जीवन म्हणजे सततचे दौरे, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि लोकांचे प्रेम आणि प्रेमाची आठवण म्हणून त्यांनी दिलेल्या भेटी. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सामाजिक जीवन म्हणजे महासागर. संघ, भाजपा संघटन, गुजरातचे तीनवेळा मुख्यमंत्री आणि सलग तीनवेळा देशाचे पंतप्रधान. भारताबरोबरच जगाच्या कानकोपऱ्यात मोदीजींचे चाहते आहेत. विविध कार्यक्रमांदरम्यान त्यांना भेट म्हणून अनेक वस्तू मिळतात. भारताची संस्कृती आणि सृजनशीलतेचे उत्तम उदाहरण असलेल्या अनेक प्रेक्षणीय वस्तूंचा यात समावेश आहे. या भेटवस्तूंचा सध्या ऑनलाइन लिलाव सुरु आहे. या लिलावातून मिळणारी रक्कम “नमामि गंगे” योजनेसाठी वापरली जाईल. कृपया या लिलावात सहभागी व्हा आणि “नमामि गंगे” योजनेला हातभार लावा, अशी विनंती चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत चालणाऱ्या या ऑनलाईन लिलावात १,३०० हून अधिक भेटवस्तू असणार आहेत. त्यामध्ये पेंटिंग, शाल, कलाकृती, शिल्पे, देव-देवतांच्या मूर्ती आणि क्रीडा स्मृतिचिन्हे यांचा समावेश असणार आहे. या वस्तू भारताची सांस्कृतिक विविधता आणि सर्जनशीलता प्रतिबिंबित करतात.