भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, कार्यालय कार्यकर्त्यांना आपले घर वाटले पाहिजे, असे वातावरण तयार करावे – मंत्री चंद्रकांत पाटील

सांगली : सांगली जिल्हा भाजपाच्या नूतन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पाटील यांनी नवनियुक्त कार्यकारिणी सदस्यांना पत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले आणि आगामी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. प्रत्येक जिल्ह्याचे कार्यालय उभारण्याचा पक्षाचा नेहमीच आग्रह राहिलेला आहे. हे कार्यालय कार्यकर्त्यांना आपले घर वाटले पाहिजे, असे वातावरण तयार करावे, अशा सूचना यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.
जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यावेळी म्हणाले, सांगली जिल्ह्यात भाजपा ग्रामीण जिल्हा विभागाचे हे पहिलेच कार्यालय आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा विश्वास सार्थ ठरवून भारतीय जनता पार्टीच्या वृद्धीकरिता व संघटनात्मक बांधणी करिता समर्पित कार्य करावे, असे त्यांनी संबोधन दिले.
या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, माजी मंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे, सत्यजीत देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, निताताई केळकर यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.