पूरग्रस्तांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून संकटकाळात मदतीचा हात पुढे करू, शहराध्यक्ष धीरज घाटे यांचे पुणेकरांना आवाहन

पुणे : सततच्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, माढा, मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून पूरस्थिती आहे. अनेक गावे, महामार्ग पुराच्या पाण्यात गेले आहेत. अनेक नागरिकांची घरे पाण्याखाली आहेत. त्यांना तात्पुरते सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. हे दिवस येथील नागरिकांसाठी अत्यंत कठीण आहेत. या काळात सगळ्यांनी महाराष्ट्रातील पूरस्थितीत अडकलेल्या नागरिकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. त्यासाठी पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू तसेच चादरी, सतरंज्या संकलित करून त्या सोलापूरमधील पूरग्रस्तांना वाटण्यात येणार आहेत.
भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन केले कि, पुणे शहरातील नागरिकांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी द्यावयाचे साहित्य आणि तांदूळ, डाळी, गहू, ज्वारी अशी धान्य स्वरुपातील मदत २६, २७ आणि २८ सप्टेंबर २०२५ या तीन दिवसांत भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहर कार्यालयात जमा करावी. डीपी रस्त्यावीर पक्षाच्या कार्यालयात मदतीच्या संकलनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. शुक्रवारी शहर कार्यालयात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आणि नगरसेवकांची बैठक घेऊन अधिकाधिक लोकांनी या मदतकार्यात सहभाग घेऊन आपल्या बांधवांसाठी मदत द्यावी, अशी सूचना करण्यात आली.
राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना या मदतकार्याबद्दल माहिती देण्यात आली असून, त्यांनी याचे स्वागत केले आहे. राज्यातील महायुती सरकार सक्षमपणे पूरग्रस्तांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. पण या संकटाचा सामना करण्यासाठी प्रत्येकाने पुढे येणे गरजेचे आहे. त्यासाठी हे मदतकार्य हाती घेण्यात आले आहे.