भारत संचार निगम लि.च्या स्वदेशी 4G मोबाईल नेटवर्कचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न

पुणे : आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्वदेशी चळवळ सुरु झाली आहे. या अंतर्गत भारत संचार निगम लि.च्या स्वदेशी 4G मोबाईल नेटवर्कचे उद्घाटन (ऑनलाईन) पुण्यातील अण्णाभाऊ साठे सभागृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार विजय शिवतारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
देशभरात सुमारे 98,000 मोबाईल 4G मोबाईल टॉवर्सची सुरुवात हा यातला पहिला उपक्रम असून, संपूर्णपणे सॉफ्टवेअर-चलित, क्लाउड आधारित आणि 5G मध्ये सहजपणे अपग्रेड करता येणाऱ्या स्वदेशी 4G नेटवर्कचे लोकार्पण हा दुसरा उपक्रम असेल.
यामुळे भारतासाठी दूरसंचार क्षेत्रात एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे, कारण भारताने आता जगातील आघाडीच्या दूरसंचार उपकरण निर्मात्यांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेअंतर्गत बीएसएनएल ने हे तंत्रज्ञान स्थापित केले आहे. यामध्ये तेजस नेटवर्कने विकसित केलेले रेडिओ ऍक्सेस नेटवर्क, सी-डॉट द्वारे निर्मित कोअर नेटवर्क आणि टीसीएस द्वारे एकीकरण केलेल्या संपूर्ण स्वदेशी 4G तंत्रज्ञानाचा समावेश आहे. ही 4G पायाभूत सुविधा प्रत्येक भारतीयाचे, मग तो कोणत्याही भौगोलिक प्रदेशात किंवा पार्श्वभूमीचा असो, जीवनमान उंचावण्यासाठी तयार करण्यात आली आहे