सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२६ वा पदवी प्रदान समारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहाने संपन्न

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२६ वा पदवी प्रदान समारंभ सोमवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहाने संपन्न झाला. यावेळी पाटील यांनी विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करुन त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. स्वतःबरोबरच देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग करावा, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
यावेळी राष्ट्रीय तांत्रिक शिक्षण मंच (NETF) आणि राष्ट्रीय मूल्यांकन व मानांकन परिषदेचे (NAAC) अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल सहस्रबुद्धे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी , प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे आणि परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. प्रभाकर देसाई यांच्यासह विद्यार्थी व विविध मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. विद्यापीठ वार्ता अंकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. कुलगुरूंनी ‘सत्य बोला, सदाचाराने वागा’ असा उपदेश दिला.
विद्या हे केवळ नोकरी मिळवण्याचे साधन नसून, समाज परिवर्तनाचे शस्त्र आहे. त्याचा वापर योग्य कारणांसाठी करावा, केवळ कपाटात ठेवण्यासाठी पीएचडी थेसिस करू नका, असा सल्लाही मंत्री पाटील यांनी दिला. येत्या महिन्याभरात प्राध्यापक भरती प्रक्रिया मार्गी लागेल, असेही त्यांनी सांगितले.
कुलगुरू डॉ. गोसावी यांनी विद्यापीठाच्या कामगिरीचा आढावा घेतला. पदवी ही केवळ ज्ञानाची खात्री नाही, तर जागतिक स्पर्धेला सामोरे जाण्यासाठीची तयारी आहे. पदवी ही नेतृत्त्व क्षमतेला जागतिक स्तरावर सिद्ध करण्याची सुरुवात आहे. त्यामुळे ज्ञानाचा उपयोग जागतिक पातळीवर योगदान देण्यासाठी करा, असेही त्यांनी सांगितले.
या सोहळ्यातून विविध विद्याशाखांमधील पदवी व पदव्युत्तर स्तरावरील ९८,८२१ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यापैकी ७८ हजार ६०९ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र, १९ हजार ५७७विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र, २७० विद्यार्थ्यांना पदविका प्रमाणपत्र, २५९ विद्यार्थ्यांना पीएचडी, तर १०३ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी पदविका प्रमाणपत्र आणि ३ विद्यार्थ्यांना एम. फिलचे प्रमाणपत्र मिळाले. यात विविध विद्याशाखांमधील गुणवंत ५४ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ८९ सुवर्णपदके प्रदान करण्यात आले. विज्ञान शाखेला सर्वाधिक ३० सुवर्णपदके मिळाली.