आमच्या नेत्यांवर पातळी सोडून बोलणाऱ्यांना आणि संस्कृती बिघडवणाऱ्यांना आता जशास तसे उत्तर मिळेल – मंत्री चंद्रकांत पाटील

सांगली : सांगली जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित इशारा सभा संपन्न झाली. ही सभाच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे रक्षण करण्याचा निर्धार होता. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडवणाऱ्यांना खबरदारीचा इशारा देण्यासाठी हि ‘इशारा सभा’ आयोजित करण्यात आली. या सभेनंतर अन्याय, खोटेपणा आणि समाज विघातक प्रवृत्तींचे प्रतीक असलेल्या रावणाचे दहन करण्यात आले. यामध्ये उपस्थित कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. सत्य, न्याय आणि संस्कृतीच्या रक्षणासाठीचा हा निर्धारच महाराष्ट्राच्या भविष्याला नवी दिशा देईल, असा विश्वास असल्याचे यावेळी पाटील यांनी म्हटले.
सभेला संबोधित करताना, आमच्या नेत्यांवर पातळी सोडून बोलणाऱ्यांना आणि संस्कृती बिघडवणाऱ्यांना आता जशास तसे उत्तर मिळेल, असा ठाम इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.
सभेतून स्पष्ट संदेश देण्यात आला की, लोकशाहीचा सन्मान राखून संघर्ष करणे ही आमची परंपरा आहे, पण नेत्यांचा अपमान, खालच्या पातळीवरची भाषा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लावण्याचा प्रयत्न आम्ही कदापिही सहन करणार नाही. आम्ही विकासासाठी, हिंदुत्व आणि संस्कृतीसाठी आहोत, पण मर्यादा ओलांडणाऱ्यांना थारा नाही.
या सभेला जिल्ह्यातील भाजपाचे आमदार, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.