वारकऱ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

आळंदी,पुणे : श्री क्षेत्र आळंदी येथे माऊलींच्या दर्शनासाठी आणि वारीसाठी मुळशी तालुक्यातून येणाऱ्या वारकरी बांधवांसाठी तसेच संप्रदायाच्या विविध उपक्रमांसाठी मुठा खोरे वारकरी संप्रदाय समितीने अत्याधुनिक सोईसुविधांनी युक्त वारकरी भवन उभारण्याचा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संकल्प केला होता. आज चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या भवनाचे लोकार्पण तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मूर्तिप्राणप्रतिष्ठा आणि कलाशारोहण सोहळा संपन्न झाला. या कार्यात मला खारीचा वाटा उचलता आला याचा अत्यंत आनंद आहे, असे मत यावेळी पाटील यांनी व्यक्त केले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, वारकरी बांधवांच्या सेवेत नेहमीच आनंद मिळतो. संतपूजनाच्या माध्यमातून दरवर्षी कोथरुड मधून वारीला जाणाऱ्या वारकरी बांधवांना पारमार्थिक साहित्य उपलब्ध करून देत असतो. श्री क्षेत्र पंढरपूरमध्येही कोथरुडमधून वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी भवन उभारता आले. वारकऱ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही यावेळी पाटील यांनी दिली.
यावेळी मुळशीचे आमदार शंकरभाऊ मांडेकर, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, देवस्थानचे चोपदार राजाभाऊ चोपदार, आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुठा खोरे वारकरी संप्रदाय समितीचे अध्यक्ष रामचंद्र महाराज भरेकर, रामशेठ गावडे, मंदार देवगावकर, अमृता देवगावकर यांच्यासह वारकरी बांधव आणि माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.