शमा भाटे यांनी केलेली कलेची सेवा यापुढेही सुरु राहावी आणि रसिकांना आनंद देत राहावी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : नृत्यगुरु शमा भाटे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त नादरूप कथक संस्थेतर्फे अमृतमहोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. भारतीय शास्त्रीय नृत्यकलेला समर्पित आयुष्य आणि अगणित शिष्यांना संस्कार देणाऱ्या शमाताई भाटे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि दीर्घायुष्यासाठी मंगलकामना दिल्या.
या कार्यक्रमाला तालयोगी सुरेश तळवलकर, पंडित हृदयनाथ मंगेशकर, पंडित श्री परु दधीच, अजय धोंगडे, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी यांच्यासह अनेक मान्यवर आणि शमाताईंचे शिष्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शमा भाटे यांनी केलेली कलेची सेवा यापुढेही सुरु राहावी आणि रसिकांना आनंद देत राहावी अशा सदिच्छा यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्या.
पंडित मंगेशकर म्हणाले, शमा भाटे या अतिशय थोर कलाकार आहेत. ५० वर्षांपूर्वी लादीदींसह मीरेच्या विराण्यांची ‘चाला वाही देस’ हि धवनिमुद्रिका केली होती. त्याच रचनांवर शमाताईंनी शिष्यांकडून याच शीर्षकाचे अतिशय उत्तम सादरीकरण केले होते. अवघ्या चार आणि सहा मात्रांमध्ये गिनती किती विविध प्रकारे करता येते याचे उत्कृष्ट उदाहरण त्यांनी पेश केले होते.