भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शरद पवार गटाचे आमदार अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड यांचा भाजपमध्ये प्रवेश

35

मुंबई : भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालय, मुंबई येथे आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) आमदार अरुण लाड यांचे चिरंजीव तसेच सांगलीचे माजी जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.

यासोबतच कोल्हापूरचे माजी नगराध्यक्ष व शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन प्रवीणसिंह पाटील, क्रांती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिगंबर पाटील, माजी उपाध्यक्ष पोपट सकपाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन नवले, तसेच सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक सरपंच, उपसरपंच आणि पदाधिकारी यांनी देखील भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन करत पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपामध्ये मोठ्या संख्येने होत असलेले प्रवेश पाहता विरोधकांना आगामी निवडणुकांमध्ये उमेदवार शोधण्याची पाळी येणार आहे, . क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड आणि इतरांच्या प्रवेशांमुळे भाजपची ताकद परिसरात वाढणार असल्याचेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठ्या ताकदीने महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्याचे काम करत आहेत. पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वामुळे नवभारत घडत आहे. आज जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतोय. ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे देशाची वाटचाल सुरू आहे. तुम्हा सर्वांचे स्वप्न साकार करण्यासाठी भाजपा कटीबद्ध आहे. बारा बलुतेदारांना न्याय देऊन उन्नती साधण्याचे काम सुरू आहे. ज्या विश्वासाने आज सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला त्यांच्या विश्वासास आम्ही पात्र ठरवू, असे रवींद्र चव्हाण म्हणाले.

या कार्यक्रमास आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सत्यजित देशमुख, आमदार मनोज घोरपडे, माजी आमदार पृथ्वीराज पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.