पंतप्रधानांनी महाराष्ट्र दौऱ्यावर येताना बळीराजासाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करावी, फक्त भाषणात नव्हे तर खात्यात उतरावी – विजय वडेट्टीवार यांचे टीकास्त्र

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर “भव्य” इव्हेंट साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. यावरून विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीकास्त्र सोडले. पंतप्रधानांनी महाराष्ट्र दौऱ्यावर येताना बळीराजासाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करावी, फक्त भाषणात नव्हे तर खात्यात उतरावी अशी मिश्किल टिपणी वडेट्टीवार यांनी केली.
विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर “भव्य” इव्हेंट साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रभर शेतकरी अतिवृष्टीने उध्वस्त झालेत. पण काही हरकत नाही, शेतकऱ्यांच्या शेतात चिखल, आणि शहरात सेल्फी विथ डेव्हलपमेंट सुरू आहे. अर्धवट प्रकल्पांचं उद्घाटन तेही झगमगाटात होतंय, कारण प्रत्येक विटेत ‘विकास’ दिसतो म्हणे. पंतप्रधानांनी महाराष्ट्र दौऱ्यावर येताना बळीराजासाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करावी, फक्त भाषणात नव्हे तर खात्यात उतरावी अशीच अपेक्षा आहे. शेतकऱ्यांचा संसार वाहून गेला, पण मतांच्या टक्केवारीवर सगळं लक्ष केंद्रित आहे. शेतकऱ्यांवरही थोडा मदतीचा वर्षावा व्हावा, ‘वचनांचा पाऊस’ तरी पडू द्या!, अशा बोचऱ्या शब्दात वडेट्टीवार यांनी पंतप्रधान दौऱ्यावर टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आहेत. नवी मुंबईतील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आणि मेट्रो 3 च्या अखेरच्या टप्प्याचे आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.