उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते समाजासाठी प्रेरणादायी ठरलेल्या व्यक्तींना ‘शिवसह्याद्री आधारवड पुरस्कार २०२५’ प्रदान
पुणे : शिवसह्याद्री चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत समाजासाठी प्रेरणादायी ठरलेल्या व्यक्तींना ‘शिवसह्याद्री आधारवड पुरस्कार २०२५’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुण्याच्या टिळक रस्त्यावरील एस पी कॉलेजच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात पाटील यांच्या हस्ते सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला बळ देण्यात आले.

या सोहळ्यास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, प्रवीण गायकवाड, गिर्यारोहक मुकुंद फडतरे, तसेच संस्थेचे अनिल शिंदे, विक्रमसिंह लावंड, नितीन साळुंखे, सागर शेडगे, रामचंद्र चोरणे यांच्यासह पुरस्कार्थी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसह्याद्री चॅरिटेबल फाउंडेशन हि संस्था समाजकल्याण आणि शिक्षण या दोन मुख्य क्षेत्रांमध्ये काम करते. शिवसह्याद्री फाऊंडेशनचा दृष्टीकोन असा समाज निर्माण करणे आहे जिथे प्रत्येक व्यक्ती, विशेषत: महिला, सामाजिक जबाबदारीची तीव्र भावना आत्मसात करेल आणि समाजाच्या उन्नतीसाठी योगदान देणाऱ्या उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होईल.