उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानमंडळाच्या सन २०२५ च्या हिवाळी अधिवेशनातील संभाव्य कामकाजाची आढावा बैठक संपन्न

मुंबई :मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानमंडळाच्या सन २०२५ च्या हिवाळी अधिवेशनातील संभाव्य कामकाजाची आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीत आगामी अधिवेशनात घेण्यात येणाऱ्या विषयांवर, प्रलंबित प्रश्नांवर तसेच विभागांच्या महत्त्वाच्या योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच सर्व विभागांनी अधिवेशनाच्या कामकाजासाठी आवश्यक तयारी वेळेत पूर्ण करावी, अशा सूचना यावेळी चंद्रकांत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून सुरू होईल. हे अधिवेशन १९ डिसेंबरपर्यंत चालेल. पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या सादर होतील. १० आणि ११ डिसेंबर रोजी त्यावर चर्चा होईल. ११ डिसेंबरला मतदान घेऊन त्या मान्य केल्या जातील.
या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, राज्य सामाईक परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ, सहसचिव संतोष खोरगडे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.