पुण्याचे माजी महापौर बाळासाहेब लक्ष्मणराव शिरोळे पाटील यांचे निधन.. बाळासाहेबांनी शहराच्या प्रगतीस नवी दिशा दिली – मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : शहर विकासासाठी समर्पित असलेले थोर व्यक्तिमत्त्व, पुण्यनगरीचे माजी महापौर स्व. बाळासाहेब लक्ष्मणराव शिरोळे पाटील यांचे आज एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त केले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले, १९७४ व १९७९ साली सलग दोन वेळा पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या बाळासाहेबांनी शहर विकासासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेतले. वाहन व्यवहार समितीचे अध्यक्ष म्हणून प्रभावी कामगिरी करत त्यांनी पुढे १९८३ मध्ये पुण्यनगरीचे महापौरपद भूषवले आणि शहराच्या प्रगतीस नवी दिशा दिली. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि शिरोळे परिवाराला या दुःखातून सावरण्याचे सामर्थ्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना, अशा भावना पाटील यांनी व्यक्त केल्या.
नागरी विकासासाठी त्यांच्या वचनबद्धतेसाठी ओळखले जाणारे एक ज्येष्ठ नेते शिरोळे यांनी पुणे महानगरपालिकेत दशकाहून अधिक काळ सेवा केली आणि त्यांच्या काळातील शहराच्या प्रभावी प्रशासकांपैकी एक म्हणून त्यांची गणती केली जात होती. शिरोळे पहिल्यांदा १९७४ मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले आणि १९७९ मध्ये पुन्हा निवडून आले. त्यांच्या कार्यकाळात, १९८३ मध्ये पुण्याचे महापौर होण्यापूर्वी त्यांनी वाहन व्यवहार समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले. जलद शहर विस्ताराच्या काळात नागरी पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि शाश्वत शहरी विकासाला चालना देण्यासाठी त्यांचे नेतृत्व स्मरणात ठेवले जाते.