संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचा सहावा पदवीदान समारंभ संपन्न

पुणे : सिम्बॉयसेस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या सहाव्या दीक्षांत समारंभा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंगजी यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य सोहळा संपन्न झाला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सिम्बॉयसेसचे कुलपती डॉ. एस. बी. मुजुमदार, सहकारी मंत्री मंगल प्रभात लोढा, माधुरीताई मिसाळ, दक्षिण सदर्न कमांडचे कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल ट्रस्टच्या संजीवनी मुजुमदार, सिम्बॉयसेस सोसायटीच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, प्र-कुलगुरू स्वाती मुजुमदार तसेच इतर मान्यवर, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज जग वेगाने बदलत असून प्रत्येक क्षणाला नवा विचार, नवी व्यवस्था, नवे तंत्रज्ञान समोर येत असताना अशा अनिश्चित जगात आपले कौशल्य आपल्या मदतीला येऊ शकते. त्यामुळे सर्वांनी मिळून कौशल्याच्या माध्यमातून देशाला पुढे नेण्याची गरज आहे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून समर्थ आणि स्वावलंबी भारताच्या उभारणीसाठी केंद्र सरकारसोबत महाराष्ट्र राज्य शासन देखील कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या सुविधा उभ्या करीत आहे आणि त्यांना प्रोत्साहनही देण्यात येत आहे. सिम्बायोसिस विद्यापीठदेखील या दिशेने काम करत असून नोकरी मिळविण्यासाठी नाही तर नोकरी देण्याची क्षमता निर्माण करणारे शिक्षण येथे देण्यात येत आहे, असे गौरवोद्गार देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काढले.
कौशल्य शिक्षण देशाच्या उभारणीसाठी महत्त्वाचे असून कौशल्यप्राप्त व्यक्ती निर्मितीसाठी योगदान देतो. निर्मितीच माणसाचे महत्त्वाचे लक्षण असून निर्मितीत व्यस्त व्यक्तीच समाजाला दिशा देऊ शकते, असे नमूद करून सिंह म्हणाले, आजच्या युगात केवळ ज्ञान उपयुक्त नसून त्याचे उपयोजन करण्याची कला अवगत असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे शिकलेल्या बाबींना जीवनात कसे आणावे हे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे हेच आजच्या शिक्षणाचे उद्दीष्ट असायला हवे. देशातील युवकाकडे कौशल्य असेल तर जगातील कोणतीच शक्ती आपल्याला रोखू शकत नाही. देशात कौशल्य विकास क्षेत्रातील प्रगती लक्षात घेता आजची पिढी कौशल्य प्राप्त करून पुढच्या युगातील तंत्रज्ञानाची पिढी घडवेल असा विश्वास वाटतो. मात्र कौशल्यासोबत संवेदनशील राहून समाजासाठी त्याचा उपयोग करणे आवश्यक आहे, असे सिंग म्हणाले.
ऑपरेशन सिंदूर हे देशाच्या आत्मनिर्भरतेचे प्रतिक होते. देशाच्या लष्कराने भारतात तयार झालेल्या शस्त्रास्त्रांचा उपयोग करीत धैर्य आणि संयमाने पराक्रम गाजविला. संरक्षण साहित्य निर्मितीमध्ये भारतीय युवांनी मोठा पुढाकार घेतला असून गेल्या १० वर्षात आपली संरक्षण साहित्य निर्मिती ४६ हजार कोटी रुपयांवरून १ लाख ५० हजार कोटींपर्यंत पोहोचली आहे. यातही सुमारे ३३ हजार कोटी रुपयांचे खासगी क्षेत्राचे योगदान आहे. २०२९ पर्यंत आपली उत्पादनक्षमता ३ लाख कोटींपर्यंत नेण्याचे आणि संरक्षण साहित्य निर्यात ५० लाख कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्राला संरक्षण तंत्रज्ञानाचे हब बनविणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
स्कूल ऑफ डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजीच्या उद्घाटनाद्वारे नव्या युगातील महत्त्वाच्या क्षेत्रात पाऊल टाकल्याबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौशल्याचे महत्त्व लक्षात घेऊन देशात एक कौशल्य विकासाचे अभियान सुरू केल्यावर सिम्बायोसिसने कौशल्य विद्यापीठाची कल्पना समोर आणली. देशाला महासत्तेच्या रुपात समोर आणायचे असल्यास देशातील तरुणाईला कौशल्य प्रदान करून कुशल मनुष्यबळात रुपांतरीत करण्याची गरज आहे. मात्र या क्षेत्रासाठी आवश्यक व्यवस्था उभी करणाऱ्या शिक्षणसंस्थांची संख्या मर्यादित आहे. सिम्बायोसिसने शिक्षणासोबत मूल्यांवर भर दिला असल्याने या क्षेत्रासाठी आंतरराष्ट्रीय स्तराच्या पायाभूत सुविधा उभ्या केल्या. युवकांच्या आशा-आकांक्षाना बळ देणारी व्यवस्था विद्यापीठात उभी केली. विद्यापीठाचे कौशल्य विकासाचे हे मॉडेल देशासाठी मार्गदर्शक ठरले आहे. यामागे विद्यापीठाचे परिश्रम आणि सकारात्मक दृष्टीकोन आहे. येत्या दोन ते तीन वर्षात जगातील अग्रगण्य कौशल्य विकास विद्यापीठात सिम्बायोसिसची गणना होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संरक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते पदवी प्रदान समारंभात १ हजार ५३२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. २ विद्यार्थ्यांना कुलपती यांचे सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. तसेच २ विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर पुरस्कार आणि एका विद्यार्थिनीला कुशल पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठाच्या स्कूल ऑफ डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे उद्घाटन करण्यात आले. संरक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौशल्य प्रशिक्षण उत्कृष्टता केंद्राला भेट देऊन विविध उद्योगांकडून कौशल्य प्रशिक्षणासाठी प्रायोजित गरजू विद्यार्थ्यांशी संवाद साधला.