उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी “फोक आख्यान” या सांगीतिक मैफिलीचा घेतला आनंद

पुणे : कोथरुड मध्य मंडल भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा हर्षाली माथवड आणि दिनेश माथवड यांच्या पुढाकारातून आयोजित “फोक आख्यान” या सांगीतिक मैफिलीचा आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आनंद घेतला.
फोक आख्यानातील अतिशय लोकप्रिय होत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकावरील गीत शाहीर चंद्रकांत माने या नव्या दमाच्या शाहिरानं सादर केलं. ह्या गीताने भारावून गेलो, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी व्यक्त केली. हे गाणं संपताच पाटील यांनी लगोलग स्टेजवर जाऊन त्यांच्या हातातलं घड्याळ काढून शाहीर मानेंच्या हातात बांधलं. सादर झालेल्या कलाविष्काराने अक्षरशः मंत्रमुग्ध झालो, असल्याचे पाटील यांनी म्हटले.
अभंग, भारूड, लावणी, गवळणी अशा लोककला नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या २० हौशी तरुण कलाकारांच्या या सादरीकरणाला कोथरूडकरांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला. संगीत दिग्दर्शक हर्ष राऊत आणि विजय कापसे यांच्या संकल्पनेतून साकारलेले “The Folk अख्यान” हे लोकसंगीत, कथा आणि नाट्य यांचा सुंदर संगम आहे.
युवा कलाकारांच्या समूहाने सुरू केलेला एक सांस्कृतिक उपक्रम आहे, जो महाराष्ट्राची लोककला आणि संस्कृती जतन करण्यासाठी आणि प्रसारित करण्यासाठी तयार केला आहे. या उपक्रमात, पारंपरिक लोककथा आणि संगीताला आधुनिक संगीतमय आख्यानाच्या रूपात सादर केले जाते, ज्यामुळे मराठी लोककलेचा वारसा तरुणांपर्यंत पोहोचतो.
यावेळी माजी नगरसेविका सौ. मोनिका मुरलीधर मोहोळ, सर्व नगरसेवक तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.