माजी वित्तमंत्री महादेवराव शिवनकर यांचे निधन…. शिवनकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रामाणिक, कार्यतत्पर आणि लोकाभिमुख नेतृत्व हरपले – मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : माजी वित्तमंत्री महादेवराव शिवनकर यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या घटनेने कुटुंबियांसह राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे मुलगा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय शिवणकर व संजय शिवणकर यांच्यासह बराच मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुःख व्यक्त केले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी अर्थमंत्री महादेवराव शिवणकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रामाणिक, कार्यतत्पर आणि लोकाभिमुख नेतृत्व हरपले आहे. शेती, सिंचन आणि ग्रामीण विकास हे त्यांच्या कार्याचे केंद्रबिंदू होते. नक्षलग्रस्त भागात विकासाची ज्योत त्यांनी प्रज्वलीत केली. पूर्व विदर्भात भाजपाच्या उभारणीत त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या परिवाराच्या दुःखात आम्ही सर्वजण मनःपूर्वक सहभागी आहोत, असे पाटील यांनी म्हटले.
जलसंपदा मंत्री आणि वित्तमंत्री म्हणून त्यांनी मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना कारभार सांभाळलाय. सोबतच जनसंघापासून ते भाजपचे ज्येष्ठ नेते असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. महादेवराव शिवनकर हे आमगाव विधानसभेचे 5 वेळा आमदार आणि चिमूर लोकसभेचे 1 वेळा खासदार म्हणून त्यांनी कार्यकाळ सांभाळला आहे.