डॉ. प्राची जावडेकर लिखित आणि उन्मेष प्रकाशन द्वारा प्रकाशित ‘पुणे-दिल्ली-पुणे’ या पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात संपन्न

19

पुणे : विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. प्राची जावडेकर लिखित आणि उन्मेष प्रकाशन द्वारा प्रकाशित ‘पुणे-दिल्ली-पुणे’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमास माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, माजी खासदार किरीट सोमय्या, रवीजी अनासपुरे, प्रकाशिका मेधा राजहंस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. साहित्य, संस्कृती आणि समाजकार्य यांचा संगम घडवणारा हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. या प्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

चंद्रकांत पाटील म्हणाले, राजकारणात पूर्णवेळ काम करणे कठीण आहे. स्वतःचा खासगी वेळ सार्वजनिक कामासाठी देणे ही अवघड बाब आहे. परंतु, प्राची जावडेकर यांच्या खंबीर पाठिंब्याच्या जोरावर प्रकाश जावडेकर यांनी पूर्णवेळ पक्षासाठी, देशासाठी काम केले, असे त्यांनी सांगितले.

पक्षाच्या प्रतिकूल काळात अविचल निष्ठेने काम करत मा. प्रकाशजी जावडेकरांसारखा सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत पोहोचला. त्यात डॉ. प्राची जावडेकर यांची साथ मोलाची होती. त्या प्रवासाचे हे शब्दचित्रण सर्वांसाठी मार्गदर्शक असून हे पुस्तक एक महत्त्वाचा दस्तावेज ठरेल, अशी प्रतिक्रिया मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

डॉ. गोहे म्हणाल्या, केवळ राजकारणच नव्हे; तर प्रत्येक क्षेत्रात पती-पत्नी दोघांनाही वेळ द्यावा लागतो. दोघांनीही एकमेकांच्या कामांना समान प्रतिष्ठा देणे महत्त्वाचे आहे. कोणतीही महिला प्रेमापोटी निरपेक्ष भावनेने घर सांभाळून नोकरी, व्यवसायही करते. हेच सहजीवनाचे खरे वैशिष्ट्य आहे. राजकीय नेत्यांच्या जीवनात पत्नीची भूमिका, सहकार्य मोलाचे आहेच. परंतु, नारी शक्ती कायद्यामुळे २०२९ नंतर ५० टक्के महिला राजकारणात येतील. त्यामुळेच पतीराजांना त्यांना समजून घेण्याची वेळ येणार आहे, हे विसरू नका.

प्राची जावडेकर यांनी सांगितले, माझ्यासारख्या मध्यमवर्गीय, साध्या मुलीचा पूर्णवेळ राजकारणी व्यक्तीची सहचारिणी म्हणून झालेला प्रवास मी या पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रकाश जावडेकर यांनी पक्षाला वाहून घेतल्यानंतर मी पुण्यात राहून मुलांकडे, कुटुंबाकडे लक्ष दिले. पुढे दिल्लीतील वास्तव्यात ‘कमलसखी’ सारखे उपक्रम राबवताना आलेले अनुभव, अनुभूती या पुस्तकातून मांडल्या आहेत.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.