महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित ‘प्राकृतिक कृषि संमेलन–२०२५’ कार्यक्रमाचे आयोजन

8

मुंबई : राजभवन, मुंबई येथे महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित ‘प्राकृतिक कृषि संमेलन–२०२५’ या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.

या संमेलना दरम्यान प्राकृतिक शेतीच्या प्रसारासाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांवर आणि शाश्वत कृषी विकासाच्या दिशेने उचलल्या जाणाऱ्या पावलांवर सविस्तर चर्चा झाली.

नैसर्गिक शेती ही निसर्गाच्या नियमांवर आधारित आहे. ही शेतीपद्धत पाण्याचा वापर ५० टक्क्यांनी कमी करते आणि भूजलपातळी वाढवते. नैसर्गिक शेती हा हवामान बदलाच्या संकटावर उपाय असून या शेतीमध्ये उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन चांगले येते. जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या रक्षणाबरोबरच पर्यावरण, प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य, पाणी आणि माती या तिन्हींचे रक्षण करण्याची ही पद्धती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असल्याचे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.

नैसर्गिक शेतीतून शाश्वत कृषी क्रांती होईल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “हवामान बदलाचा शेतीवर होत असलेला गंभीर परिणाम लक्षात घेता, नैसर्गिक शेती ही त्यावरचा सर्वाधिक परिणामकारक उपाय आहे.” त्यांनी स्पष्ट केले की, नैसर्गिक शेती ही केवळ सेंद्रिय शेतीसारखी नाही, तर ती अधिक शाश्वत आणि पर्यावरणपूरक आहे. २०१४ मध्ये झालेल्या नैसर्गिक शेती मिशनचा हा उपक्रम राज्य शासनाने सुरू केला मात्र त्यावेळी नैसर्गिक व सेंद्रीय शेती हे दोन्ही एकत्रच राबविण्यात आले. नैसर्गिक आणि सेंद्रीय शेती पद्धतीत भेद ठेवला नव्हता. मात्र २०२३ मध्ये राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या मार्गदर्शनानंतर महाराष्ट्रात २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याचा राज्य शासनाचा संकल्प आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शेतकऱ्यांच्या अडचणींचं मूळ हे वाढत्या उत्पादन खर्चात आहे. उत्पादन खर्च कमी करून आणि उत्पादकता वाढवूनच शेती लाभदायक होऊ शकते. नैसर्गिक शेती ही त्याचा सर्वोत्तम उपाय आहे, कारण निसर्गाने दिलेल्या गोष्टींचा उपयोग आपण खते, कीटकनाशके आणि पोषक द्रव्यांकरिता करू शकतो. ‘‘शेतीच्या सेंद्रिय चक्रात गोधनाचं महत्त्व अधोरेखित करत त्यांनी सांगितले की, “आपल्या संस्कृतीत गोमातेला उच्च स्थान आहे, कारण ती शेतीला जगवते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही संविधानात गोसंवर्धनाचं तत्त्व अधोरेखित केलं, कारण गोधन हे नैसर्गिक शेतीचं मुख्य आधारस्थान आहे.” गोमूत्र, शेण, जीवामृत यांमधून मिळणाऱ्या पोषक घटकांमुळे शेतीत जैविक संतुलन राखलं जातं.

नैसर्गिक शेतीच्या गरजेबाबत जनजागृती आवश्यक – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यपाल देवव्रत स्वतः शेतकरी असून, ते जवळपास २०० एकर जमिनीवर नैसर्गिक शेती करत आहेत आणि त्यांचे अनुभव मोलाचे आहेत. महाराष्ट्राला नैसर्गिक शेतीत आवड असलेले राज्यपाल लाभले आहेत हे राज्याचे सौभाग्य आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे देखील नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देत आहेत. प्रधानमंत्री यांनी लोकप्रतिनिधींसाठी नैसर्गिक शेतीचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी परिषद घेण्याचे निर्देश दिले होते. नैसर्गिक शेतीची गरज आणि गैरसमज, काळाची गरज ओळखून नैसर्गिक शेतीसाठी पाऊल उचलणे आवश्यक आहे. लोकांमध्ये ‘उत्पादन कमी होईल’ असा गैरसमज आहे, तो दूर करण्यासाठी जनजागृती, प्रचार आणि लोकांचे अनुभव आवश्यक आहेत, असेही ते म्हणाले.

या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, मंत्रिमंडळातील सहकारी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.