खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या ‘खासदार जनसंपर्क सेवा अभियाना’ला मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती… कोथरुड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या “खासदार जनसंपर्क” उपक्रमाअंतर्गत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड मतदारसंघातील बाणेर-बालेवाडी भागातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी नागरिकांना दिली. स्थानिकांनीही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला. अशा प्रकारच्या उपक्रमातून नागरिकांशी संवाद साधण्यात तसेच त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी काम करताना मनाला एक वेगळेच समाधान मिळत असल्याचे पाटील यांनी म्हटले.
वैयक्तिक कामे, सार्वजनिक समस्यांचे विषय, नागरी प्रश्न तसेच विकासकामांसंदर्भात नव्या कल्पना नागरिकांनी मांडल्या. तातडीने सोडवता येणाऱ्या प्रश्नांवर त्वरित निर्णय घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच काही विषयांवर कार्यवाही करण्याचे निर्देशही दिले. यावेळी पुणे महापालिका, पोलीस, वाहतूक पोलीस तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नागरिकांच्या सोयीसाठी या अभियानात पुणे महापालिका, राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विविध योजनांचे स्टॉल्स लावण्यात आले होते, ज्याचा लाभ मोठ्या संख्येने नागरिकांनी घेतला.