पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार अखेर रद्द… हा निर्णय म्हणजे पारदर्शक, जबाबदार आणि जनतेच्या हिताचे शासन कसे असावे याचे उत्तम उदाहरण – मंत्री चंद्रकांत पाटील
 
				पुणे : पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून तातडीने दखल घेतली आणि न्यायनिष्ठ निर्णय सुनिश्चित केला. मुख्यमंत्री यांच्या हस्तक्षेपानंतर धर्मादाय आयुक्तांनी या विवादित जमीन व्यवहाराला रद्दबातल ठरविण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय म्हणजे पारदर्शक, जबाबदार आणि जनतेच्या हिताचे शासन कसे असावे याचे उत्तम उदाहरण असल्याचे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. तसेच या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार देखील मानले.
या संपूर्ण प्रकरणात विविध आरोप व टीका होत असतानाही जैन समाजासाठी अत्यंत शांत, संयमी आणि संतुलित भूमिका घेतलेल्या केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचेही चंद्रकांत पाटील यांनी विशेष अभिनंदन केले. या निर्णयामुळे जैन समाजाच्या मागणीला योग्य तो न्याय मिळाला असून, जैन मुनींचाही सन्मानपूर्वक आदर केला गेला आहे. यासाठी संपूर्ण जैन समाजाचेही मनःपूर्वक अभिनंदन, असे पाटील यांनी म्हटले.
जैन बोर्डिंग प्रकरणात धर्मादाय आयुक्तांसमोर आज सुनावणी पार पडली. त्यावेळी जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिले. 4 एप्रिल 2025 रोजी धर्मादाय आयुक्त यांनी या व्यवहारासंदर्भात दिलेले स्वतःचे आदेश मागे घेतले. त्यामुळे हा व्यवहार पूर्णपणे रद्द ठरवण्यात आला आहे.
 
			