उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे लिखित ‘दाही दिशा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

17

मुंबई : यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे लिखित ‘दाही दिशा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. हे निव्वळ पुस्तक नसून संघर्षगाथा असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी काढले.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या लेखणीतून समाजातील विविध पैलूंवर उलगडलेले विचार निश्चितच वाचकांना नवी दिशा देतील असा विश्वास यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत, ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ, दैनिक सकाळ मुंबई आवृत्तीचे संपादक राहुल गडपाले, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद जोशी तसेच अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

डॉ.नीलम गोऱ्हे यांनी लिहिलेले हे पुस्तक अनेक चळवळ आणि लढ्याचा कोलाज आहे. हे पुस्तक म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून केलेल्या संघर्षाचा सर्वंकष आढावा असल्याचे यावेळी अधोरेखित केले. मराठवाडा विद्यापीठाचा नामांतर लढा असेल, मुलींना मुरळी बनण्यापासून रोखणारे आंदोलन असेल, सत्यशोधक महिला परिषदेचे काम असेल, १९९३ च्या किल्लारी भूकंपावेळी त्यांनी केलेले काम असेल. त्यांनी कायम महिलांचे प्रश्न हाती घेऊन भगिनीभाव जपण्याचे काम केले असल्याचे यावेळी नमूद केले. त्यांच्या मार्गदर्शनाने कायमच राज्याला नवी दिशा मिळाली असून, त्यांचे ‘दाही दिशा’ हे पुस्तक पुढील पिढीला नक्की प्रेरणा देईल असा विश्वास याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

डॉ. नीलम गोऱ्हे यांचा साहित्य प्रवास अत्यंत समृद्ध आणि समाजकेंद्री आहे. त्यांनी आजवर ३० हून अधिक पुस्तकांचे लिखाण केले असून, हे साहित्य सामाजिक चळवळ, कायदा, महिला प्रश्न, राजकारण आणि संवेदनशील समाजनिर्मितीच्या दिशेने महत्त्वपूर्ण ठरले आहे. त्यांच्या उल्लेखनीय पुस्ताकांमध्ये “स्त्रिया व कायदा”, “महिलांसंबंधी धोरण – स्वयंसिद्धतेकडे वाटचाल” (१९९४), “पीडित महिलाओं की सहेली”, “पंचायतराज मार्गदर्शक”, “अन्यायग्रस्त महिलांची मैत्रीण”, “महिला मंडळ मार्गदर्शक”, “उरल्या कहाण्या”, “नारीपर्व”, “कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा: स्वरूप व कार्यपद्धती”, “महिला आणि समाज”, तसेच “भिंतीमागचा आक्रोश (महिलांचा अनैतिक व्यापार)” यांचा समावेश आहे.

“दाही दिशा” या पुस्तकाद्वारे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शब्दांना समाजजागृतीचे सामर्थ्य दिले असून, स्त्रीशक्तीच्या प्रबोधनाचा आणि समाजातील न्याय्य समतोल निर्माण करण्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचविला आहे. हा ग्रंथ म्हणजे त्यांच्या विचारप्रवासाचा, संवेदनशीलतेचा आणि नेतृत्वगुणांचा साक्षात आरसा आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.