मौजे इस्लामपूर आता ‘ईश्वरपूर’ आणि ‘इस्लामपूर नगर परिषद’ आता ‘उरुण-ईश्वरपूर’, राज्य सरकारने जारी केली अधिसूचना
मुंबई : इस्लामपूर शहराच्या नामांतराचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे पाठवला होता. मंगळवारी केंद्रीय गृहमंत्रालयाने हा प्रस्ताव मंजूर करून मौजे इस्लामपूर आता ‘ईश्वरपूर’ आणि ‘इस्लामपूर नगर परिषद’ आता ‘उरुण-ईश्वरपूर’ असे जाहीर केल्याची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. हा निर्णय केवळ नावबदल नाही, तर सांस्कृतिक ओळख आणि स्थानिक भावनांना मान देणारा एक ऐतिहासिक टप्पा आहे, असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
या महत्वपूर्ण निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमितभाई शाह यांचे पाटील यांनी मनःपूर्वक आभार मानले. तसेच सतत पाठपुरावा करून हे स्वप्न साकार करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त केले.
या निर्णयाची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर, महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबतची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार, “मौजे इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली या गावाचे नाव बदलून ‘ईश्वरपूर’ असे करण्यात आले आहे. तसेच, ‘इस्लामपूर नगर परिषदेचे नाव आता ‘उरुण-ईश्वरपूर नगर परिषद’ असे करण्यात आले आहे.” या निर्णयामुळे आता सर्व शासकीय, प्रशासकीय आणि स्थानिक संस्थांच्या नोंदींमध्ये ‘ईश्वरपूर’ हे नाव वापरले जाणार आहे. राज्य सरकारने जुलैमध्ये पावसाळी अधिवेशनात या नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला होता. आता अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर, नामांतराचा हा शासकीय प्रवास पूर्ण झाला असून, भारतीय सर्वेक्षण विभाग, भारतीय डाक विभाग आणि भारतीय रेल्वे खात्यालाही त्यांच्या नोंदी बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.