टीम इंडियाची उपकर्णधार आणि सांगलीची कन्या स्मृती मंधानाच्या घरी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली सदिच्छा भेट
सांगली : महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला नमवत ऐतिहासिक विजय मिळवला. टीम इंडियाची उपकर्णधार आणि सांगलीची कन्या स्मृती मंधानाच्या घरी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाऊन तिच्या आई-वडिलांचे विशेष अभिनंदन केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी अशोक काकडे देखील उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील स्मृती मंधानाच्या वडिलांना म्हणाले, बाबा, स्मृती आणि तिच्या टीमने जी अतुलनीय कामगिरी केली, त्यामुळे प्रत्येक भारतीय अभिमान व्यक्त करत आहे. ह्या मुलींच्या कामगिरीमुळे ग्रामीण भागातील प्रत्येक मुलगी आकाशाला गवसणी घालेल, असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला.
टीम इंडियाची उपकर्णधार आणि अनुभवी ओपनर स्मृती मानधना हिने संपूर्ण वर्ल्ड कप स्पर्धेत जबरदस्त सातत्य राखलं. तिने 9 मॅचेसमध्ये 54.25 च्या एव्हरेजने एकूण 434 रन्स केल्या आणि वर्ल्ड कपच्या एकाच एडिशनमध्ये सर्वाधिक रन्स करण्याचा मिताली राजचा भारतीय रेकॉर्ड मोडला. तिच्या परर्फॉर्मन्समध्ये 1 सेंच्युरी आणि 4 फिफ्टींचा समावेश आहे. तिने प्रतिका रावलसोबत अनेक महत्त्वाच्या पार्टनरशिप्स केल्या. विशेषतः न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये तिने 95 बॉलमध्ये 109 धावांची शानदार सेंच्युरी ठोकली, ज्यामुळे टीम इंडियाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. अंतिम मॅचमध्येही तिने 45 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.