सांगलीला जोडणारा ऐतिहासिक आयर्विन पुलाला समांतर नवीन पुलाचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न
सांगली : सांगली येथे सांगलीला जोडणारा ऐतिहासिक आयर्विन पुलाला समांतर नवीन पुलाचे लोकार्पण सोहळा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. आमदार सुधीरदादा गाडगीळ, आमदार सुरेशभाऊ खाडे आणि माजी आमदार दिनकरतात्या पाटील यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या नव्या पुलामुळे सांगलीकरांची वाहतूक अधिक सुलभ होणार असून सांगली ते पेठ मार्गावरील प्रवास आता अधिक सोपा आणि वेगवान होईल, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी यावेळी दिली.
आयर्विन पूल परिसर, टिळक चौक, हरभट रोड, सांगली येथे हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या पुलामुळे आयर्विन पूल परिसरातील वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. शहरातील उत्तर-दक्षिण भागांतील संपर्क अधिक सुलभ होईल. सांगलीच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा पूल महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
द्रकांत पाटील म्हणाले, 2016 मध्ये सावित्री नदीवरील पूल कोसळून 40 प्रवाशांना जलसमाधी मिळाली होती. त्यानंतर राज्यातील सर्वच पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश दिले होते. धोकादायक पुलांचा अभ्यास करून दुरुस्तीचे आदेश दिले होते. त्यावेळी सांगलीत आयर्विन पुलाला पर्यायी समांतर पुलाच्या बांधकामासाठी आमदार सुधीर गाडगीळ तसेच आमदार सुरेश खाडे यांनी बराच पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे या पुलाचे बांधकाम झाले आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी भाजप जिल्हा पदाधिकारी, प्रदेश व राष्ट्रीय पदाधिकारी, नगरसेवक, लोकप्रतिनिधी, मंडल अध्यक्ष, पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख तसेच सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.