पुण्यात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत वंदे मातरम् सार्ध शताब्दी महोत्सव उत्साहात संपन्न
पुणे : भारतीय स्वातंत्र्यलढ्याला चेतना, चैतन्य आणि ऊर्जा देणाऱ्या ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला यंदा १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक पर्वानिमित्त सांस्कृतिक विभाग, पुणे पुस्तक महोत्सव, वंदे मातरम् सार्धशती जयंती समारोह समिती आणि जन्मदा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे ‘वंदे मातरम् उत्सव’ साजरा करण्यात आला. या प्रसंगी ‘वंदे मातरम्’ विषयाचे अभ्यासक श्री. मिलिंद सबनीस लिखित ‘ध्यास वंदे मातरम्चा’ या पुस्तकाचे प्रकाशन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमात सर्व उपस्थितांनी उत्साहाने सामूहिक वंदे मातरम् पठण करून मातृभूमीप्रती अभिवादन केले. श्री. मिलिंद सबनीस लिखित ‘ध्यास वंदे मातरम्चा या पुस्तकातून वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताच्या शोधाचा अद्भुत प्रवास उलगडण्यात आला आहे. दरम्यान यावेळी या राष्ट्रप्रेमी वातावरणात दोन कलाकृती देखील नागरिकांच्या भेटीला आल्या. ज्यामध्ये कवी बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या अजरामर ‘आनंदमठ’ कादंबरीवर आधारित ‘संगीत आनंदमठ’ या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला.

आशिष शेलार म्हणाले, संविधानाने राष्ट्रगीत म्हणून संबोधित केलेल्या ‘वंदे मातरम्’ या गीतातील शब्द प्रत्येक भारतीयाला स्फुरण देणारे आहेत. राज्य, भाषा, प्रांत, भेद याला बाजूला ठेवून सर्वांच्या एकतेचं हे गीत आहे आणि म्हणून या गीताला मातृगीत सुद्धा म्हणता येईल. कारण या गीतामध्ये आपल्या भारतमातेची आराधना केलेली आहे. असे विचार मांडत उपस्थितांसोबत त्यांनी संवाद साधला.
स्वदेशी वस्तू, ठिकाणे आणि संसाधनांचा वापर करणार असल्याची यावेळी सर्वांनी शपथ घेतली आणि वंदे मातरम् गीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
या प्रसंगी कार्यक्रमाचे संयोजक तथा भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, भाजपा पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, पुणे पुस्तक न्यासाचे युवराज मलिक, विश्वकर्मा प्रकाशनचे विशाल सोनी, मकरंद केळकर, प्रसेनजित फडणवीस, बागेश्री मंठाळकर, संजय चाकणे, सुनील महाजन, पुनीत जोशी, रवींद्र साळेगावकर यांच्यासह असंख्य राष्ट्रप्रेमी नागरिक या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते.