“वंदे मातरम्” गीताला १५० वर्षे पूर्ण – राष्ट्र सेविका समितिचा अभिमानास्पद उपक्रम उत्साहात संपन्न
पिंपरी चिंचवड : शासनाने “वंदे मातरम्” गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल काढलेल्या शासननिर्णयाला (GR) उत्स्फूर्त प्रतिसाद देत राजमाता जिजामाता ट्रस्ट आणि राष्ट्र सेविका समिति यांच्या संयुक्त विद्यमाने एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समितिच्या सेविका सौ. स्नेहा रणजित कलाटे यांच्या पुढाकाराने अतिशय स्तुत्य असा उपक्रम उत्साहात पार पडला.

कै मारुती गेणु कस्पटे शाळा, कस्पटे वस्ती,वाकड येथे हा कार्यक्रम पार पडला. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी “वंदे मातरम् – इतिहास आणि सामूहिक गायन” या विषयावर माहितीपूर्ण सत्र आणि देशभक्तीने भारलेले सामूहिक गायन आयोजित करण्यात आले.

या कार्यक्रमात समितिच्या सेविका सौ. स्नेहा रणजित कलाटे यांनी विद्यार्थ्यांना “वंदे मातरम्” गीताचा ऐतिहासिक प्रवास, त्यातील देशप्रेमाचा संदेश आणि आपल्या संस्कृतीतील त्याचे स्थान यावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
राष्ट्र सेविका समितिच्या सेविका अंजली व्यास, वीणा बक्षी, नीलिमा जोशी आणि श्रेया पांडे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या परिश्रमांमुळे कार्यक्रम अत्यंत उत्साहात, देशभक्तीच्या वातावरणात आणि विद्यार्थ्यांच्या सहभागाने यशस्वीरीत्या पार पडला.