योग शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत अधिक व्यापकपणे पोहोचावे यासाठी शासनाच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य करणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
सांताक्रुज, मुंबई : सांताक्रूज, मुंबई येथील आज द योगा इन्स्टिट्यूटला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन, संस्थेमध्ये सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला. द योगा इन्स्टिट्यूटच्या उत्कृष्ट कार्याचे कौतुक करत, योग शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत अधिक व्यापकपणे पोहोचावे यासाठी शासनाच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला.
देशातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित योग संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संस्थेमध्ये चालणारे प्रशिक्षण, संशोधन, आरोग्यवर्धक कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांसाठी राबवले जाणारे शैक्षणिक उपक्रम याबाबत चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मनमोकळी चर्चा झाली.
या प्रसंगी आमदार पराग आळवणी, डॉ. हंसाजी योगेंद्र, ऋषी योगेंद्र, मीना नल्ला तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.