बिहारमधला निकाल म्हणजे लोकांचे मोदीजी यांना असणारे जनसमर्थन – मंत्री चंद्रकांत पाटील
सांगली : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा-एनडीएने मिळवलेला ऐतिहासिक विजय संपूर्ण देशभरात उत्साहाने साजरा केला जात आहे. या विजयाची लाट महाराष्ट्रातही जाणवली असून महायुतीमध्ये नवचैतन्य आणि उत्साह अधिक वृद्धिंगत झाला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली दौऱ्यादरम्यान हा विजयोत्सव साजरा केला. बिहारमधला निकाल म्हणजे लोकांचे मोदी जी यांना असणारे जनसमर्थन असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले. या ऐतिहासिक विजयाचा आनंद उरुण–ईश्वरपूर येथे माता-भगिनींना लाडू वाटप करून साजरा केला.
उरुण-ईश्वरपुर नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी महायुतीचे उमेदवार विश्वनाथबापू डांगे यांनी प्रचंड उत्साह आणि जनसागराच्या उपस्थितीत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बोलताना पाटील यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा-एनडीएने मिळवलेला ऐतिहासिक विजयाबाबत आनंद व्यक्त केला. ते म्हणाले बिहार मध्ये जो निकाल लागला तो वोट चोरी नाही तर लोकांचं मोठ्या प्रमाणात मोदीजींना जनसमर्थन आहे. मोदीजींनी २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर या देशाचं संपूर्ण चित्र बदललं. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये सुख- समाधान आणलं, सुरक्षा आणली. मोदी पंतप्रधान झाले तेव्हा देश ११ व्या क्रमांकावर होता आता चौथ्या क्रमांकावर आहे, आणि २०३० मध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर येईल, २०४७ पर्यंत क्रमांक एक वर येणार आहे, असे पाटील यांनी म्हटले.
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप्रणित एनडीए आघाडीने शानदार विजय मिळवला आहे. या निवडणूकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे. या निवडणुकीत काँग्रेससह इतर पक्षांना मोठा फटका बसला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि जेडीयू चा ऐतिहासिक विजय झाला. या निवडणुकीत भाजपला ८९ जागा मिळाल्या तर जेडीयूने ८५ जागांवर विजयाची मोहोर उमटवली. तर महाआघाडीतील इतर पक्षांना २८ जागा मिळाल्या.नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार या जोडीने अशी कमाल साधली की एनडीएचा आकडा तब्बल 200 च्या पुढे गेला.