रोजगार आणि आरोग्य या दोन महत्त्वाच्या क्षेत्रांवरही विशेष भर देण्याची गरज – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सांगली : सांगली येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या बाबासाहेब चितळे महाविद्यालयात बजाज सेवा तंत्रज्ञान विकास कार्यक्रम, टाटा स्ट्राईव्ह आणि काकासाहेब चितळे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, समाज उभारणीत चितळे कुटुंबाचे योगदान उल्लेखनीय आहे. बदलत्या काळात कौशल्य विकास हा रोजगाराच्या संधी वाढविण्याचा प्रभावी मार्ग आहे. बाबासाहेब चितळे महाविद्यालयात हे केंद्र स्थापन होणे ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. या उपक्रमाची व्याप्ती आणखी वाढवावी, तसेच शेतीवर आधारित कौशल्य विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांसाठी रोजगाराचे नवे मार्ग खुले करावेत, असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले. रोजगार आणि आरोग्य या दोन महत्त्वाच्या क्षेत्रांवरही विशेष भर देण्याची गरज असल्याचे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमास भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे, बजाज ऑटो लिमिटेड सीएसआरचे उपाध्यक्ष सुधाकर गुडपती, टाटा स्ट्राईव्हचे सीईओ अमेय वंजारी, काकासाहेब चितळे फाउंडेशनचे गिरीश चितळे, टाटा स्ट्राईव्हचे रिजनल मॅनेजर प्रदीप लिंगावत, तसेच सुभाष कवाडे, सुमेध कुलकर्णी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.